कचरा वेचणाऱ्या महिलेला पैसे देणे नाकारत मारहाण, अंगावर श्वान सोडले, महिला जखमी; तिघांवर गुन्हा दाखल

कोथरूड : कचरावेचक महिलेला तिचे हक्काचे पैसे न देता तिला मारहाण करून तिच्या अंगावर पाळीव श्वान सोडणाऱ्या तिघांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत ही महिला जखमी झाली आहे. याबाबत लक्ष्मी दत्ता गायकवाड (वय ६५, रा. जयभवानीनगर, कोथरुड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सुप्रिया कांबळे (वय २३, रा. कोथरुड), हिच्यासह तिचा भाऊ आणि वडिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मी गायकवाड कचरावेचक आहेत. त्यांनी कांबळे हिच्या घरातील कचरा उचलला नव्हता. तुम्ही कचरा का उचलला नाही? असा जाब तरुणीने त्यांना विचारला. तुम्ही तीन महिने कचरा उचलण्याचे पैसे दिले नाही, असे गायकवाड यांनी तिला सांगितले. या कारणावरून सुप्रियाने गायकवाड यांच्याशी वाद घातला. तरुणीने गायकवाड यांना दांडक्याने मारहाण केली. घरातील पाळीव श्वान गायकवाड यांच्या अंगावर सोडले. श्वानाने गायकवाड यांचा चावा घेतला. तसेच सुप्रिया कांबळे यांनी गायकवाड यांना जिन्यावरून खाली फरफटत आणले. त्यामुळे सुप्रिया कांबळे यांना गंभीर दुखापत झाली आहे. सुप्रियाच्या वडिलांनीही मारहाण केल्याचे गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.

कोथरूडच्या जय भवानी नगर येथे एका संस्थेच्या वतीने कचरा वेचण्यासाठी महिलांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कचरा वेचणाऱ्या या महिलांना दरमहा ७० रुपये द्यायचे असतात, महापालिकेने तसा संस्थेसोबत करार केलेला आहे. मात्र अनेकजण महिलांना ७० रुपये द्यावे लागू नयेत म्हणून रात्री अपरात्री कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकतात. सुप्रिया कांबळे यांनी मागील तीन महिन्यांपासून पैसे दिले नव्हते. त्यामुळे लक्ष्मी गायकवाड यांनी त्यांच्या घरासमोरील कचराही उचलला नाही. या गोष्टीचा सुप्रिया यांना राग आला. आरोपी सुप्रिया हिने फिर्यादी महिलेला कचरा का उचलला नाही असे विचारणा केली आणि त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
सुप्रिया कांबळे हिने त्यानंतर लाकडी दांडक्याने फिर्यादी गायकवाड यांच्या डोक्यात आणि पाठीवर मारले त्यात त्या जखमी झाल्या. याच दरम्यान सुप्रिया कांबळे यांच्या भावाने त्यांच्या अंगावर घरातील श्वान सोडले. कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. त्यानंतर सुप्रियाच्या वडिलांनी आपल्याला जिन्यावरुन फरफटत खाली आणले, अशी तक्रार लक्ष्मी गायकवाड यांनी नोंदवली आहे.


