पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यावर रुपाली चाकणकर संतापल्या

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आक्रमक भूमिका घेत पुतळा हटवण्याचं दुष्कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

रुपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र सदनातील घटनेवर संताप व्यक्त करताना केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘आज दिल्लीमधील महाराष्ट्र सदन येथे विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी तेथून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही अवघ्या तीन दिवसांवर आली असताना देशामध्ये स्त्री सन्मानाच्या चळवळीच्या अग्रस्थानी असलेल्या या दोन महान विभूतींचा हा अपमान आहे, त्यांचं अस्तित्व आणि त्यांचा दैदिप्यमान इतिहास नाकारण्याची मानसिकता उघड करत आहे,’ असा गंभीर आरोप यावेळी चाकणकर यांनी केला आहे.
आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारविरोधात हल्लाबोल करताना म्हटलं आहे की, ‘महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी करण्यासाठी न्यायाची स्थापना करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही विश्वव्यापी कर्तृत्वांचे पुतळे हटवून अपमान करणे महाराष्ट्र शासनास शोभणारे नाही. हे करत असताना सर्वसामान्यांचा अभिमान असणारी महाराष्ट्र शासनाची मुद्रा झाकली जात आहे. याचे भान देखील सरकारला राहिले नाही.



भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना विविध प्रश्नांवरून घेरत असतात. विशेषत: अहिल्यादेवी होळकर यांच्यासंबंधीच्या अनेक मुद्द्यांवरून पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी इथे काही वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला पडळकर यांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र सदनात झालेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी पडळकरांना खिंडित गाठण्याचा प्रयत्न केला आहे. ‘नेहमी गोंधळ घालणारे बोलघेवडे चॉकलेट बॉय महाराष्ट्र सदनातील घटनेवर गप्प का? या घटनेचा निषेध करण्याची हिम्मत ते दाखवतील का?’ असा बोचरा सवाल रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता केला आहे.



