साहित्य संमेलनात राजकारण्यांच्या सहभागावरून होणारा वाद निरर्थक : डॉ. राजा दीक्षित,

21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन..
पुणेः- साहित्य संमेलन म्हटले की चर्चा आणि वाद होतातच. संमेलनाच्या आवश्यकतेपासून व्यासपीठावर राजकारण्यांचे काम काय या प्रश्नापर्यंत त्या चर्चा आणि वाद रंगतात. मी या वादात पडण्यापेक्षा या वादशी संबंधीत टोकाची भूमिका घेण्याऐवजी साहित्यिक आणि आयोजकांनी संयत भूमिका घेतली पाहिजे, असे मत मांडेल. साहित्य संमेलनात राजकारण्याांच्या सहभागावरून होणारा वाद निरर्थक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित यांनी व्यक्त केले.
साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे आयोजित 21 व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन आज महाराष्ट्र डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोतल होते. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे आयोजित या संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. यावेळी या संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे, सचिव वि.दा. पिंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.राजा दीक्षित म्हणाले की, राजकीय मंडळी देखील शेवटी एक माणूस असतो. त्याची पण एक वैचारिक, बौद्धिक बैठक असते. त्याची पण साहित्याविषयी, समाजाविषयी एक भूमिका असते. त्याच्या त्या भूमिकेचा आदर राखत राजकीय मंडळी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आल्यास किंवा त्यांना येऊ दिल्यास त्यात काही अपराध होईल किंवा साहित्यिक चौकट मोडून पडेल, असे मानणे अतिशयोक्तीचे होईल. साहित्य हे समाजातील विविध घटना आणि प्रसंगातूनच निर्माण होत असते. त्यामुळे राजकारण, समाजकारण आणि साहित्य हा त्रिवेणी संगम साधत भविष्यात वाटचाल झाली पाहिजे.
सृजनशील साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकास साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे आपण समजू शकतो. परंतु, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने लोकसाहित्याच्या अभ्यासिका डॉ. तारा भवाळकर यांना अध्यक्षपद देऊन लोकसाहित्याविषयीची आस्था अधोरेखित केली आहे. मनुष्य हा मुळात उत्सवप्रिय प्राणी आहे. लोकमान्य टिळक यांनी म्हटल्याप्रमाणे उत्सव हे आयुर्वर्धक आणि शक्ती वर्धक असतात, हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक, अभ्यासक राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे समाजाचे मंडळीकरण झाले पाहिजे, या मताशी मी सहमत आहे. यामुळे साहित्य आणि संस्कृती पर्यंत लोकशाही पाझरेल आणि लोकशाही अधिक बळकट होईल.

यावेळी संमेलनाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना डॉ. तारा भवाळकरयांनी लोकसाहित्याच्या बदलत्या प्रवाहांचा आढावा घेत लोकसाहित्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, लवचिकता हा लोकसंस्कृतीचा आणि लोकसाहित्याचा गुण आहे. नागरी जीवनातील काटेकोरपणा ग्रामीण जीवनशैलीत नाही, तसा तो लोक संस्कृती आणि लोकसाहित्यात देखील नाही. लोकसाहित्य टिकवायचे तर लोकसाहित्यातील ही लवचिकता टिकवून ठेवली पाहिजे. जगण्यातील सहजता हे लोकसाहित्याचे मुख्य सूत्र आहे आणि विविध विधी, परंपरा, श्रद्धा हा लोकसाहित्याचा गाभा आहे. गेल्या काही वर्षात आपली जीवनपद्धती, शिक्षण पद्धती, अर्थकारण सारे काही बदलले आहे. या सगळ्यात श्रद्धा आणि परंपरा यांची जागा व्यवहारांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सहिष्णुता, लवचिकता आणि सर्वांना सामावून घेण्याची ताकद असलेल्या लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याकडे आपण डोळसपणे बघण्याची गरज आहे.



यावेळी बाबा जाधव, विलास पंढरी, बाळासाहेब गिरी, विजय पानवलकर, शैलेश त्रिभुवन, के.डी. पवार, संभाजी चौगुले आदी प्रतिथयश नवोदित साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर आणि पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष दिलीप बराटे यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे वि.दा. पिंगळे यांनी केले.
संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी या संमेलनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. राहुल बळवंत यांच्या हस्ते झाले. यानंतर शब्दांगण, पुणेचा सहभाग असलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते झाले.



