शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी 29 जुलै रोजी वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण केले होते. महाराष्ट्र सरकारने त्यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन गौरव केला होता.
बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन केले. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले आहे.’जाणता राजा’ या ऐतिहासिक गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन केले. राजा शिवछत्रपती, पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आदी साहित्य प्रकाशित झाले आहे. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.




