कर्वेनगरमध्ये रस्त्यावरून वाहतोय सांडपाण्याचा ओढा ; पालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
कर्वेनगर : रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे कर्वेनगर मधील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्वेनगरच्या मुख्य चौकातच सांडपाणी ओढ्यासारखे वाहत असून त्यातच उभे राहून प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर वाहन चालकांना वाहन चालवण्याची कसरत करावी लागत आहे. एवढी भयानक परिस्थिती असताना प्रशासन मात्र या प्रकाराकडे दर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
सातत्याने कर्वेनगर चौकात सांडपाणी वाहत आहे. साई बाबा मंदिर, चौकातील कर्वेनगर बस स्टॉप, हिंगणे होम कॉलनी कडे जाणारा रस्ता अशा मार्गाने रोज सांडपाण्याचा लोंढा वाहत असतो. हींगणे होम कॉलनीमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणीच रस्त्यावर सांडपाण्याचे तळे साचलेले असते. त्यातून मार्ग काढताना पादचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पायावर, कपड्यांवर सांडपाणी उडू नये म्हणून महिलांची, विद्यार्थिनींची होणारी तारांबळ, बस थांब्यावर दुर्गंधी येत असतानाही याच सांड पाण्याच्या बाजूला उभा राहून बसची वाट पाहावी लागणं, सांड पाण्यातून जाणाऱ्या गाड्यांमुळे ते पाणी आपल्या आंगावर उडू नये म्हणून घ्यावी लागणारी काळजी मन हेलावून टाकणारी आहे. महापालिका प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या या नरकयातना किती दिवस सहन करायच्या असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कर्वेनगर चौकात वाहणारे सांडपाण्याचे चित्र कर्वेनगरच्या विकासाचे मापदंड अधोरेखित करत आहे अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे. बाहेर गावाहून कर्वेनगर मध्ये येणाऱ्यांना आपण खरेच पुण्यातील एका भागात आलो आहोत का असा प्रश्न त्यांना येथील परिस्थितीवरून पडल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की
संतप्त प्रतिक्रिया
कर्वेनगर चौकातला हा नेहमीचा प्रश्न आहे. प्रशासन याकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. रोज सकाळी बाहेर पडल्यानंतर बस ने प्रवास करणाऱ्या नागरिकांना सांडपाण्यातून मार्ग काढत आपल्या दिवसाची सुरुवात करावी लागत आहे आणि हे भयानक आहे. हिंगणे होम कॉलनी, वडार वस्ती या भागात आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. यावर तातडीने उपाययोजना नाही झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.
विनोद मोहिते.
प्रशासनाचा निष्क्रिय कारभार कर्वेनगर चौकातील या गंभीर प्रकारावरून पुढे येत आहे. निधी खर्च करायचा पण कामे नीट करायची नाहीत हेच येथे दिसून येत आहे. नागरिकांना सांडपाण्यात उभा राहून बस ची वाट पाहावी लागत असेल तर यापेक्षा कर्वेनगर वासियांच दुसरं दुर्भाग्य काय असू शकेल. प्रशासनाला आपण करत असलेल्या कामाची लाज वाटायला हवी. आपण नागरिकांना काय भोगायला लावतोय याची त्यांना जाणीव नसेल तर एक दिवस नागरिकांचा संयम संपेल आणि याची किंमत त्यांना नक्की भोगावी लागेल.
चेतन भालेकर
प्रशासनाने गांभीर्यपूर्वक या प्रश्नाकडे पाहणे गरजेचे आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हिंगणे होम कॉलनीत प्रवेश करताना या सांडपाण्यातूनच नागरिकांना मार्ग काढावा लागत आहे आणि यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण होऊ लागली आहे. पालिकेने नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा आणि लवकरात लवकर यावर उपाययोजना करावी.
प्रमोद शिंदे
कर्वेनगर चौकात रोज वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. महिला, विद्यार्थिनींना याच सांडपाण्यात उभे राहून बसची वाट पहावी लागत असून प्रशासनाची बघ्याची भूमिका चीड निर्माण करणारी आहे. नागरिक शांत आहेत याचा प्रशासनाने चुकीचा अर्थ काढू नये व त्यांच्या संयमाची प्रतीक्षा पाहू नये. तातडीने यावर उपाययोजना नाही झाल्यास नागरिकांना घेऊन महापालिका सहाय्यक आयुक्तांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल : तेजल दुधाने
महापालिका प्रशासन कर्वेनगर वासियांना सध्या नरकयातना देत आहे. सातत्याने हा प्रकार घडत असताना त्यावर प्रशासन मार्ग काढू शकत नसेल तर पालिका अधिकाऱ्यांमध्ये काम करण्याची क्षमता आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. नुसत यायचं आणि पाहणी करायची याने प्रश्न सुटत नाही. या ठिकाणी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
प्रतिक नलावडे
प्रशासनाला खरंच नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे का असा प्रश्न येथील परिस्थितीवरून निर्माण होत आहे. ज्या ठिकाणी काही सेकंद कोणी थांबू शकत नाही अशा ठिकाणी थांबून नागरिकांना बस ची प्रतीक्षा करावी लागत आहे. टॅक्स रुपी पैसे भरून नागरिकांना अशा सुविधा मिळत असतील तर ही मोठी शोकांतिका आहे.
सचिन फोलाने