शिर्के दवाखाना चालू करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश : दुधाने

कर्वेनगर : लॉकडाउनच्या काळात कर्वेनगर मधील महापालिकेच्या विजयाताई शिर्के दवाखान्यातील कर्मचारी कोविड सेंटरला पाठवण्यात आल्याने गेले सात महिने हा दवाखाना बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांना इतर आजारावर उपचार घेण्यासाठी व लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी अडचण निर्माण झाली होती. नागरिकांच्या सोयीकरिता हा दवाखाना चालू करण्यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता व त्या पाठपुराव्याला यश आले असून हा दवाखाना सुरु करण्यात आला असल्याचे नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी सांगितले.

हा महापालिकेचा दवाखाना गेली सात महिने बंद असल्याने कर्वेनगर परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य नागरिक, महिला भगिनी यांच्या लहान मुलांचा लस व औषध उपचारांचा प्रश्न निर्माण झाला होता. अनलॉकच्या दिशेने आपण वाटचाल करीत असताना नागरिकांना आरोग्यविषयक इतर सर्व सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. याच अनुषंगाने महापालिका प्रशासनाकडे नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे कोथरूड मतदार संघाचे अध्यक्ष स्वप्निल दुधाने यांनी हा दवाखाना त्वरित सुरु करावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचबरोबर या भागातील सामाजिक संस्थांनीही हा दवाखाना सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
या सर्व गोष्टींचा विचार करून महापालिका प्रशासनाने हा विजयाताई शिर्के दवाखाना सुरू केला आहे . नागरिकांना इतर आजारांवरील उपचारासंदर्भात व लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात येणाऱ्या अडचणी आता सुटणार आहेत.



