२५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू, ११२२ पैकी १६ प्रवासी बाधीत

मुंबई : इंग्लंडमध्ये जनुकीय बदल झालेला कोरोना विषाणू आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेतली जात असून प्रशासन सज्ज झाले आहे. २५ नोव्हेंबरनंतर इंग्लंडहून राज्यात आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
आजपर्यंत ११२२ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचणीत १६ प्रवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळले आहे. जनुकीय रचना शोधण्यासाठी रुग्णांचे नमुने पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे.
बाधित रुग्णांमध्ये नागपूर ४, मुंबई व ठाणे प्रत्येकी ३, पुणे २ आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. आजवर शोधण्यात आलेल्या ७२ निकट सहवासितांपैकी २ निकट सहवासित कोरोना बाधित आढळले आहेत. महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी ही माहिती जाहीर केली आहे.




