तुम्ही फक्त भावकीत भांडू शकता ; सुषमा अंधारे यांचे राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांबद्दल तुम्ही ठाम भूमिका घेत नाही. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसे म्हणजे मतदार नसलेला सेना अशी टीका केली त्यांना तुम्ही उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही फक्त भावकीत भांडण करू शकता अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
गोरेगाव येथील मनसे गटनेत्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली होती. माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात अस आहे. ते 360 डिग्रीत फिरत आहेत. एकनाथ शिंदे यांनी जादूची कांडी फिरवली आणि घरात बसलेले मुख्यमंत्री बाहेर आले अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, यावर बोलण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राच काय नवनिर्माण करणार आहात त्याचं बोला, टोल नाक्याच आंदोलन करण्यापेक्षा रस्ते नीट आहेत का ते बघा त्याच आंदोलन करा, वडापावची गाडी हटवा, टॅक्सीवाल्यांच आंदोलन करायचं यापेक्षा गुज्जू बिल्डरांनी जे अतिक्रमण केले आहे त्यावर राज ठाकरे काहीच बोलत नाहीत, त्यामुळे ते 360 डिग्री फिरत आहेत असंच कायम वाटतं असं अंधारे म्हणाल्या.







