कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघर सुविधेसाठी सर्वतोपरी मदत – चंद्रकांत पाटील

पुणे : कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघरचा पायलट प्रोजेक्ट तुम्ही सुरु करा त्यासाठी लागणारा सर्व निधी मी व्यक्तिशः सी एस.आर च्या माध्यमातून उपलब्ध करेन असे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी खेळघर सुविधा उपलब्ध करावी ह्या मागणीसाठी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतच्या पूर्णिमा चिकरमाने,
सारिका क्षीरसागर, आशा जगधने,झरीना शेख,
सायली प्रदीप यांनी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह आज आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
जागतिक बालमजुरी विरोधी दिनी कागद काच पत्रा कष्टकरी पंचायतीने कष्टकरी पालकांसोबत जोखमीच्या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांची स्थिती कोव्हीड काळात बिकट झाली होती असे केकेपीकेपी ने केलेल्या सर्वेक्षणानुसार निदर्शनास आले होते. त्यास अनुसरून ह्या मुलांसाठी काय करता येईल ह्याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानुसार आज आ. चंद्रकांत पाटील यांच्या समवेत विस्तृत चर्चा करण्यात आली.

ह्या चर्चेनंतर पाटील यांनी पायलट प्रोजेक्ट ची कल्पना मांडली व त्यानुसार कालांतराने असे खेळघर शहर भर उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शविली. कष्टकरी वर्गाच्या विविध संघटनांशी चर्चा करून पायलट प्रोजेक्ट चा प्रस्ताव सादर करू असे पुर्णिमा चिकरमाने व सायली प्रदीप यांनी सांगितले.



