रोहिणी खडसे यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेच्या ३ पदाधिकाऱ्यांसह ७ जणांवर गुन्हा

मुंबई : माजी मंत्री तथा राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या वाहनावर सोमवारी रात्री हल्ला झाला होता. या प्रकरणात शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांसह इतर 4 अनोळखी व्यक्ती अशा 7 जणांविरुद्ध मंगळवारी 28 रोजी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई आणि चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी यांचा समावेश आहे. रोहिणी खडसे -खेवलकर यांनी याप्रकरणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, सोमवारी रात्री चांगदेव येथील हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री 9 च्या सुमारास मानेगाव फाट्या पासून अर्ध्या किमी अंतरावर त्यांच्या कारसमोर तीन मोटरसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला.
यावेळी गाडीच्या प्रकाशात चेहरे दिसून आले, त्यात सुनील पाटील याने वाहनांच्या डाव्याबाजूने येऊन माझ्याकडे पिस्तूल रोखले. चांगदेव ग्रा.पं. सदस्य पंकज कोळी याच्या हातात तलवार होती तर छोटू भोई याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र आतून लॉक असल्याने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी गाडीवर हल्ला चढविला. यात गाडीची काच फुटली. अंधारात त्यांच्या सोबतचे अन्य चार अनोळखी आरोपीही या हल्ल्यात सामील होते, असे फिर्यादीत नमूद आहे.




