महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल महागाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

पुणे : पेट्रोल व डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर केल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नसल्याचे आणि तोक्तसारख्या चक्रीवादळात गुजरातला महाराष्ट्रापेक्षा जास्त मदत केली गेली. एकूण थेट करात ( डायरेक्ट टॅक्स) महाराष्ट्राचा वाटा ३८.३ टक्के एवढा आहे. थेट कर आणि जीएसटी असे दोन्ही कर एकत्र केले तर महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. असं असूनही आजही राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे पेट्रोल व डिझेल महागले आहे ही वस्तुस्थिती नाही,” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात.

शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा केवळ निर्णय घेतला नाही तर त्यांना ती मिळेल हे पाहिलं. कोविड काळात सर्व दुर्बल, असंघटित क्षेत्रातील नागरिकांनाही आर्थिक साहाय्य केलं. शिवभोजनसारखी थाळी मोफत दिली. आर्थिक आव्हानांना पेलत महाराष्ट्राने आपली जबाबदारी पार पाडली. संघराज्याविषयी बोलताना सर्व राज्यांना केंद्राकडून समान वागणूक मिळणे अपेक्षित आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राज्य सरकार वारंवार राज्यातील आपत्तीच्या वेळी एनडीआरएफचे तोकडे निकष वाढवून आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची मागणी केंद्राकडे करत आलेली आहे, मात्र केंद्रानं यावर काहीही पाऊलं उचलली नाही. राज्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने नैसर्गिक वायूच्या अनुषंगाने कर सवलती यापूर्वीच दिल्या आहेत. नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता या वायूवरील मुल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्क्यांहून कमी करून तो ३ टक्के केला आहे. पाईप गॅसधारकांना, सार्वजनिक वाहतूकदारांनाही लाभ मिळत असून राज्यातील सर्व जिल्ह्यात पाईप गॅस वापरण्यास यामुळे प्रोत्साहन मिळत आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याने उद्धव ठाकरेंनी नाराजी जाहीर केली आहे. नागरिकांना वस्तुस्थिती कळावी म्हणून हे स्पष्ट करणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले आहेत.

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये