पुण्यात तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अनेक राजकीय महत्वाच्या लोकांचे फोन टॉपिंग करुन गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी शुक्ला यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पाडे यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे.

परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर शुक्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही मोठी कारवाई असल्याची चर्चा पोलीस दलात केली जात आहे. रश्मी शुक्ला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्य सरकारची गोपनीय माहिती लिक केल्याचा आरोप करण्यात आले होेते. दरम्यान, परमबीर सिंग यांच्यावरील कारवाईनंतर राज्यातील दुसऱ्या मोठ्या आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महाविकास आघाडी सरकारने केलेली ही दुसरी सर्वात मोठी कारवाई आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी शासनाची दिशाभूल करून काही खासगी व्यक्तींचे फोन टॅप केलेे. त्यांची ही कृती भारतीय टेलिफोन ॲक्टचा गैरवापर करणारी आणि संबंधित व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा गंभीर ठपका तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी चौकशी अहवालात ठेवला होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा संदर्भ देऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता.



फोन टॅपिंग प्रकरणात मागे दोन वेळा सायबरकडून चौकशीला हजर राहण्या संदर्भात समन्स रश्मी शुक्ला यांना बजावण्यात आले होते. पण, दोन्ही वेळा कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी टाळाटाळ केली होती. एवढंच नाहीतर ईमेल द्वारे प्रश्न पाठवावे, त्याची उत्तरं देते, अशी मागणीही शुक्ला यांनी केली होती.
पोलीस अधिकारी चौकशीला बोलावत असल्यामुळे रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद हायकोर्टात सुद्धा धाव घेतली होती, ‘आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला होता. त्यानंतर मे 2021 मध्ये मुंबई सायबर सेलच्या टीमने हैदराबादमधील घरी जाऊन शुक्ला यांचा जबाब नोंदवला. जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे फेटाळून लावले होते. रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला. रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले होते. रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते.



