अनिल अवचट यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्यांचं निधन झालं. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अनिल अवचट यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. त्यांनी एम.बी.बी.एस ची पदवी पुणे येथील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून घेतली. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. सामाजिक प्रश्नांसोबतच अनिल अवचट यांनी विविध विषयांवर लेखन केलं. ‘रिपोर्ताज’ हा दीर्घ लेखन प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. 1969 मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केलं होतं, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची 38 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.

लेखनासोबतच चित्रकला आणि ओरिगामीचीही त्यांना आवड होती. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती.
अनिल अवचट यांची मुलगी डॉ. मुक्ता पुणतांबेकर आता मुक्तांगणचं काम पाहतात. डॉ. अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नेहमीच नकार दिला. त्यांनी आपली पत्रकारिता नेहमीच गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. डॉ. अनिल अवचट यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी विपुल लिखाण केलं.
2021 मध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.



