
पुणे : पुणे मेट्रो चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्चला होणार आहे. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयाच्या मेट्रो स्टेशन ते आनंद नगर मेट्रो स्टेशन पर्यंत होणार आहे. याच कारणामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत कर्वे रस्ता आणि पौड रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील. याबाबतच्या सूचना पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दिल्या आहेत.

कर्वे रोडवर खंडूजी बाबा चौक (डेक्कन) ते शिवतीर्थनगर (कोथरूड) पर्यंतच्या रस्त्यावर कोणत्याही वाहनाला जाण्यास परवानगी नसल्याने, कोथरूडकडे जाण्यासाठी, लोक अलका टॉकीज चौक-लाल बहादूर शास्त्री रोड-सेनादत्त चौक किंवा दांडेकर पुलाचा वापर करून डीपी रोड-गुळवणी महाराज रोड-कर्वे रोडवरील करिश्मा सोसायटीपर्यंत पोहोचू शकतात.
तसेच शिवतीर्थनगर ते खंडूजी बाबा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता पुढील प्रमाणे-शिवतीर्थनगर-मयूर कॉलनी-हुतात्मा चौक-निंबाळकर बाग-डीपी रोड/गुळवणी महाराज रोड-रिव्हरसाइड रोड ते डेक्कन किंवा सेनादत्त चौक लाल बहादूर शास्त्री रोड या पर्यायी रस्त्यांचा वापर लोक करू शकतात. शिवतीर्थ नगर येथून डेक्कन परिसरात येणारी वाहने मयूर कॉलनी येथे वळविण्यात येणार आहेत.






