राष्ट्रवादीच्या सामाजिक व स्वयंसेवी संघटना पुणे शहराध्यक्षपदी नंदिनी पानेकर यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या पुणे शहरअध्यक्ष पदी नंदिनी पानेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रवक्ते अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण यांच्या पुढाकारातून ही निवड करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या समाजकारणातून राजकारण या समीकरणानुसार सामाजिक व स्वयंसेवी संस्थां हा नवीन सेल स्थापन करण्यात आला असून यामार्फत शहरातील सामाजिक संस्थांना मदत-सहकार्य व त्यांच्या कार्याचे कौतुक तसेच त्यांच्या मार्फत नवनवीन संकल्पना राबवण्याचा मानस या मध्यमातून असणार आहे.
शहरातील महिलांना रोजगारनिर्मितीची नवनवीन साधने, नवीन काही शिकण्याच्या संधी,घरगुती कामे, महिला व लहान मुले यांच्या आरोग्यासाठी विविध शिबीर या संस्थांमार्फत राबवण्यात येणार आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून या नवीन सेलच्या माध्यमातून पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहचवणार असल्याचे नंदिनी पानेकर यांनी निवडीनंतर सांगितले.



