किरण दगडे पाटील हे पुण्यातील आधुनिक श्रावणबाळ ; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गौरवद्गार..
काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन आलेल्या हजारो नागरिकांचा सामूहिक गंगापूजन सोहळा संपन्न
मुळशी : आपल्या हिंदू संस्कृतीत काशीविश्वनाथाची यात्रा ही अतिशय पुण्याची यात्रा मानली जाते. अशी ही पुण्याची काशी विश्वनाथाची यात्रा हजारो नागरिकांना घडवणारे भारतीय जनता पक्षाचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे पाटील हे पुण्यातील आधुनिक श्रावणबाळ आहेत असे गौरवद्गार पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.
नुकतीच किरण दगडे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात भोर, वेल्हा, मुळशी, कोथरूड, बावधन भागातील ३००० नागरिकांना काशी विश्वनाथाची यात्रा घडवली. ही यात्रा पूर्ण करून आलेल्या यात्रेकरूंसाठी विधिवत भव्य गंगा पूजन सोहळ्याचे आयोजन मुळशीतील घोटावडे फाटा येथील सुंदरबन लॉन्स येथे करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे, भाजपा जिल्हाध्यक्ष वासुदेव(नाना) काळे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका अल्पना गणेश वरपे, भाजपा जिल्हाध्यक्ष महिला आघाडी स्नेहल दगडे पाटील, मुळशी भाजपा तालुकाअध्यक्ष विनायक ठोंबरे, भोर भाजपा तालुकाअध्यक्ष जीवन कोंडे, वेल्हा तालुकाध्यक्ष सुनिल जागडे, स्वीकृत सभासद वैभव मुरकुटे, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मुळशी तालुका वैशाली सणस, भाजपा नेते शाम धुमाळ, राजाभाऊ वाघ, सुनिलभाऊ दगडे, जीवन साखरे, गणेश सातव, अलका ववले, सोपान निबुदे, स्वीकृत सभासद बाळाभाऊ टेमकर, व यात्रेचे आयोजक माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, बावधनच्या माजी सरपंच पीयुषा किरण दगडे तसेच यात्रेला गेलेले नागरिक त्यांचे नातेवाईक हजोरोंच्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणाले, किरण दगडे पाटील दरवर्षी आपल्या भागातील नागरिकांना मोफत काशीविश्वनाथांची यात्रा घडवतात. तद्नंतर सर्व यात्रेकरुंचे गंगापूजन करुन त्यांची यात्रा सफल आणि संपन्न करतात. अनेकांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घ्यायचे स्वप्न पाहिलेलं असते, आपल्या भागातील नागरिकांचे ते स्वप्न पूर्ण करण्याचे काम किरण दगडे पाटील यांनी केलेले आहे. आता लवकरच आयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर पूर्ण होईल. तिथे पुन्हा प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होईल. ही यात्राही पुण्यकारक असणार आहे. त्यामुळे भविष्यात त्याचेही नियोजन करावे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी एवढया मोठ्या संख्येने नागरिकांना काशी विश्वनाथाचे दर्शन करून आणल्याने एक मोठे पुण्याचे काम केले आहे. या नागरिकांचा आशीर्वाद कायम त्यांच्या पाठीशी राहतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शंकर महादेवाची पूजा करण्यात आली. सर्व यात्रेकरूंना फेटे घालण्यात आले होते. ढोल ताशांचा आवाज, त्यानंतर मंत्रोच्चार, आरती, पूजा यामुळे गंगा पूजन सोहळ्याचे वातावरण भक्तीमय झाले होते. अनेक यात्रेकरू भाविकांनी यात्रा सफल केली त्यानंतर गंगा पूजनाचा सोहळाही भव्यदिव्य केला याबद्दल किरण दगडे पाटील यांचे आभार व्यक्त केले.
प्रास्ताविक करताना किरण दगडे पाटील यांनी काशी विश्वनाथ यात्रा कशा पद्धतीने पार पडली याची माहिती दिली. हजारो नागरिकांना कशी विश्वनाथाचे दर्शन घडवू शकल्याने मनाला आत्मिक समाधान मिळत आहे. या यात्रेदरम्यान नागरिकांशी भावनिक नाते तयार झाले आहे, ऋणानुबंध जुळले गेले आहे ते कायम जपले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर श्री रामाच्या दर्शनासाठी मोफत अयोध्या यात्रेचेही आयोजन करणार असल्याचे किरण दगडे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
गंगा पूजन सोहळा संपन्न झाल्यानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.