आमदाराची ऑडिओ क्लिप म्हणजे भाजपच्या विकृत संस्कृतीचे आणखी एक उदाहरण : दिपाली धुमाळ

पुणे : pune city पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने महापालिकेच्या महिला अधिकाऱ्याशी असभ्य भाषेत साधलेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून याबाबत आता सर्वच स्तरातून असंतोष व्यक्त केला जात आहे. ही ऑडिओ क्लिप म्हणजे भाजपच्या विकृत संस्कृतीचे आणखी एक उदाहरण असल्याची टीका पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.
धुमाळ यांनी म्हंटले आहे की, भाजप नेत्यांनी महिलांशी अशा पद्धतीने बोलणे किंवा महिलांचा अपमान करणे ही काही पहिली वेळ नाही. मागील काही दिवसांत सातत्याने असे प्रकार घडत आहेत. पण अशा नेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा भाजप पक्ष त्यांना पाठीशी घालत आला आहे.
ठेकेदारासाठी महिलांना शिवीगाळ करणारे भाजपचे पदाधिकारी जनतेच्या हितासाठी काही करत नाहीत.
या अगोदर सुध्दा कोरोनाच्या काळात महिला आरोग्य अधिकारी यांना एका भाजप नगरसेवकाने अश्लील शिवीगाळ केली होती. भाजपच्या महिला नगरसेविकेच्या पतीची अशाच प्रकारची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्याप्रमाणे काही दिवसापूर्वी राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिला कलावंताविषयी असभ्य भाषा वापरली होती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. अशा नेत्यांना पक्ष पाठीशी घालत असल्याने या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलीही सुधारणा होताना दिसत नाही. महिलांचा अपमान करणे हीच भाजपची खरी संस्कृती असून भाजपच्या अशा विचारांचा मी निषेध व्यक्त करते असे धुमाळ यांनी म्हंटले आहे.




