राष्ट्रीय

‘अग्निपथ’विरोधात हिंसक आंदोलन; मोदी सरकारचे एक पाऊल मागे, वयोमर्यादेत बदल

नवी दिल्ली : अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘अग्निपथ’ योजनेबाबत तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असल्याचे दिसून आले आहे. भाजपच्या आमदाराच्या वाहनावर संतप्त तरुणांनी दगडफेक केली. या योजनेत नोकरीची सुरक्षितता नसणे आणि पेन्शन लाभ न मिळणे हे आंदोलकांच्या दृष्टीने आक्षेपाचे मुद्दे आहेत. दोन वर्षे करोनामुळे लष्करभरती होऊ शकली नाही, त्यामुळे तरुणांमध्ये असंतोष आहे. आता ही योजनाच रद्द करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये या योजनेविरोधात हिंसक आंदोलने झाली आहेत. आंदोलनाची वाढती व्याप्ती आणि तरुणांमधील असंतोष पाहून केंद्र सरकारला एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. तरुणांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ करत या योजनेचा निषेध केल्यानंतर सरकारने वयोमर्यादा २१ वरुन २३ वर नेली आहे. या योजनेच्या आखणीसंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

चार वर्षांच्या सेवेनंतर रोजगाराचे काय, असा प्रश्न आंदोलक विचारात आहेत. त्यानंतर बिहारमध्ये या योजनेच्या निषेधाचा सूर उमटला़ त्याचे लोण उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, जम्मू, हिमाचल प्रदेश, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले. बिहारमधील बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये तरुणांनी रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवर जाळपोळ केली. भाजपच्या आमदाराच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी आरा रेल्वे स्थानकावर एका रेल्वेइंजिनाला आग लावली. छाप्रा, भबुआ रेल्वे स्थानकांतही आंदोलकांनी मोडतोड केली़  आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या.

उत्तर प्रदेशमध्ये तरुण योजनेविरोधात रस्त्यावर

उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्य़ांत तरुणांनी दगडफेक, घोषणाबाजी करत या योजनेचा निषेध केला. अलिगड आणि आग्रा येथे आंदोलकांनी दगडफेक केली.  निदर्शनांमुळे अलिगडमध्ये दोन तास वाहतूक विस्कळीत झाली. आग्रा येथे सरकारी बसवर दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी आग्रा-जयपूर महामार्गही रोखून धरला.  बुलंदशहर, मथुरा, फिरोजाबाद आणि बलिया या जिल्ह्यांतही तरुण रस्त्यावर उतरले.

हरियाणात जाळपोळ

हरियाणाच्या पालवलमध्ये शेकडो तरुणांनी रस्त्यावर उतरून वाहनांची जाळपोळ केली. आंदोलकांनी रस्ते रोखून धरत दगडफेकही केली. गुरुग्राम, रेवारी, छार्की, हिसार, रोहतक या जिल्ह्यांमध्ये आंदोलन झाले.  पालवलमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला.  या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले. हिंसाचारामुळे पालवलमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

राजस्थान, मध्य प्रदेशातील तरुण योजनेविरोधात आक्रमक

राजस्थानमध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या नेतृत्वाखाली तरुणांनी निदर्शने केली. जयपूर, जोधपूर, अजमेरमध्ये हिंसक आंदोलन झाले.  या जिल्ह्यांत जादा पोलीस कुमक मागवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर आणि इंदोर येथे आंदोलन झाले.

राजधानी दिल्लीतही आंदोलन

दिल्लीतही आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखून धरले.  जम्मूमध्ये बी़ सी़ मार्गावरील लष्करी कार्यालयाबाहेर तरुणांनी निदर्शने केली. तसेच त्यांनी काही ठिकाणी रस्ते रोखून धरले  पोलिसांनी निदर्शकांवर लाठीमार केला.

आंदोलनामुळे रेल्वेच्या गाड्या रद्द

उत्तर भारतात तरुणांच्या हिंसक आंदोलनामुळे ३४ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तसेच आठ गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले, आंदोलनामुळे ७२ रेल्वेगाडय़ांना विलंब झाल्याचेही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संयमाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका

तरुणांना ‘अग्निपथा’वर चालायला लावून त्यांच्या संयमाची ‘अग्निपरीक्षा’ घेऊ नका, या शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. तरुणांचा स्वप्नभंग करू नका, असे सांगत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सरकारला लक्ष्य केले. माकप, भाकप, समाजवादी पक्ष, बसप आदी पक्षांनीही केंद्र सरकारवर टीका केली़ ‘अग्निपथ’ योजनेविरोधात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांत आंदोलन करण्याची घोषणा राष्ट्रीय लोकदलाने केली आहे. 

बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीतील संयुक्त जनता दलाने वेगळी भूमिका घेतली. आंदोलकांची बाजू ऐकण्याची गरज व्यक्त करत संयुक्त जनता दलाने भाजपची कोंडी केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये