नळस्टॉप चौकातील फुटपाथ होतोय रुंद पण रस्ता होतोय अरुंद; वाहतूक कोंडी वाढणार मंदार बलकवडे यांचा आरोप

कोथरूड: नळ स्टॉप चौकातील फुटपाथ रुंद करण्याचे काम केले जात असून प्रशासनाला या चौकातील वाहतूक कोंडी कमी करायची आहे का वाढवायची आहे असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मंदार बलकवडे यांनी उपस्थित केला आहे.
या चौकात उड्डाण पूल करण्यात आल्यानंतर चौकातील रस्ते अरुंद झाले आहेत, त्यामुळे उड्डाण पुल करूनही चौकात होत असलेला वाहतूक कोंडीचा मुद्दा कायम चर्चेत राहिला आहे. उड्डाणपूल करूनही चौकात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाण पुलाच्या टप्प्यात असलेले बस थांबे बंद करण्यात आले आहेत. अशा चुकीच्या उपाययोजना राबवल्या जात असतानाच आता चौकातील फुटपाथ झाडे लावण्यासाठी रुंद केला जात असल्याने प्रशासन समस्या सोडवण्याएवजी वाढवत असल्याचा आरोप बलकवडे यांनी केला आहे.
बलकवडे म्हणाले की प्रशासनाने समस्या कमी करण्याचे काम करायचे असते पण येथील कामावरून ते समस्या वाढवत असल्याचे दिसत आहे. लोकांना त्रास होणार असेल तर अशी कामे टाळणे गरजेचे आहे. केवळ कोणाच्या फायद्यासाठी अशी कामे करू नयेत. या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला प्रशासन जबाबदार राहणार आहे.
