महाराष्ट्र

राज्यपालांनी कंगना प्रमाणे सहृदयता दाखवत माझ्यावरील अन्याय दूर करावा

पुण्यातून राज्यपालांना पत्र

पुणे : अभिनेत्री कंगना राणावत प्रमाणे आस्था आणि सहृदयता मला ही दाखवावी. माझ्यावर झालेला अन्याय दूर करावा. अशी खास पुणेरी शैलीत मागणी बांधकाम व्यावसायिक आणि चित्रपट निर्माते निलेश नवलाखा यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

निलेश नवलाखा यांनी साधारण दहा चित्रपटांची निर्मिती केली असून त्यातील तीन चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर काही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. नवलाखा यांनी राज्यपालांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, अभिनेत्री कंगना राणावत यांनी केलेल्या बेकायदेशीर बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत आपण वैयक्तिक लक्ष घातले. ती तुम्हाला येऊन भेटली. तिची तुम्ही आस्थेने  विचारपूस देखील केली. अधिकाऱ्यांशी ही तुम्ही याबाबत बोलले. आपली एका कलाकाराविषयी सहृदयता बघून मलाही आपण वेळ देऊन माझ्यावर होत असलेला अन्याय समजून घ्याल असा विश्वास आहे.

नवलाखा यांनी पत्रात नमूद केले आहे की, आपण कलाकारांना दिलेली वागणूक बघून मला खूपच आनंद झाला आहे. साहेब, मी देखील एक चित्रपट व्यावसायिक आणि छोटासा बांधकाम व्यावसायिक आहे. माझा पुण्यातील हडपसर येथील भागात एक छोटा बांधकाम प्रकल्प चालू आहे. माझ्या बांधकामासमोरच मागील चार पाच वर्षात अनेक अनधिकृत बांधकामे झाली. त्यामुळे कायदेशीर बांधकाम करणाऱ्या माझ्यासारख्या प्रामाणिक व्यावसायिकाचे खूपच आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच्या विरोधात पुणे महानगरपालिकेत मी रीतसर अनेक अर्ज देखील केले. परंतु आजपर्यंत महानगरपालिकेने त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही.

कोरोनाबरोबर भारतातले दुसरे सर्वात मोठे संकट हे आर्थिक स्वरूपाचे आहे. आज गेली ६ महीने काम बंद असल्यामुळे प्रचंड मंदी आहे, माझ्या सारख्या अनेक मराठी व्यवसायिकांना आर्थिक अडचण जाणवत आहे म्हणूनच आपल्या कडून सहहृदयता व मदतीची ची अपेक्षा आहे.

माझ्यासारख्या प्रामाणिक व्यावसायिकाला न्याय मिळालेला नाही. मला कसल्याही प्रकारची मदत झालेली नाही. आज संपूर्ण भारतात कोरोना नामक महामारीने थैमान घातलेले असताना आपण या विषयाची इतक्या तत्परतेने दखल घेतली आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे कि, आपण जसे मुंबईत महापालिकेच्या कामात लक्ष घातलं आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या कामात देखील लक्ष घालून माझ्यासारख्या प्रामाणिक व्यावसायिकांना न्याय मिळवून द्याल. ज्याप्रमाणे आपण कंगना राणावतला भेटण्याची वेळ आणि संधी दिलीत त्याचप्रमाणे मला देखील भेटण्याची वेळ देऊन म्हणणे मांडण्याची संधी द्यावी असं नवलाखा यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये