अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कोंढवा शाखेची सुरवात उत्साहात

पुणे: अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आपला विस्तार वाढवताना कोंढवा भागात आपल्या शाखेची सुरुवात केली आहे. ब्राह्मण समाजाला एकत्रित संघटित करण्यासाठी या भागात शाखेचे स्थापना व पूर्व कार्यकारिणी समिती स्थापन करण्यात आली असून कोंढव्या सारख्या सर्व जाती धर्माच्या लोकांची वस्ती असलेल्या भागात, प्रतिकूल परिस्थितीत ब्राह्मण समाजाला या शाखेअंतर्गत एकत्र आणले जात आहे.
स्थानिक रहिवासी व महासंघाचे सभासद असलेल्या बजरंग देशपांडे यांच्या प्रयत्नांनातून कोंढवा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या भागातील अनेक सन्माननीय व प्रतिष्ठित, सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या अनेक ब्राह्मण लोकांनी यात सहभाग नोंदवला व समाजाच्या प्रगतीसाठीचे आपले विचार मांडले.

ब्राह्मण समाजाला संघटित करून एक उत्तम शाखा या भागात तयार करण्याचा मानस सगळ्यांनी यावेळी व्यक्त केला व त्यासाठी प्रत्येकी किमान दहा ब्राह्मण सभासद पुढील बैठकीसाठी जोडण्याचे आव्हान स्वीकारले.महिलांचा व जेष्ठ नागरिकांचा उत्साह, प्रगल्भ विचार यांनी कोंढव्या सारख्या भागात पुढील काही दिवसात एक मोठी शाखा नावारूपास येईल याची खात्री यावेळी व्यक्त करण्यात आली.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे यांनी ABBM चे ध्येय, उद्दिष्टे तसेच भारतभर सुरू असलेले ब्राह्मण समाजासाठीचे कार्य व समाजापरी असलेले आपले कर्तव्य, योगदान याची माहिती दिली व उपस्थितांच्या मनातील प्रश्नांचे निरसन केले.






