पुणे शहर

जम्बो रुग्णालयाचा घेतला महापौरांनी प्रत्यक्ष अनुभव

पुणे : जम्बो रुग्णालय सुरू झाल्यापासून चर्चेचा विषय ठरले आहे. रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाही, उपचारांमध्ये दिरंगाई होते, नीट सुविधा मिळत नाहीत, अशा तक्रारींचा पाढा या रुग्णालयाच्या संदर्भात वाचण्यात आला. नेमकी जम्बो हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ? इथली यंत्रणा कशी आहे? याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आज महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्ण, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला.

मोहोळ यांनी सांगितलं आहे की, आधीच्या एजन्सीचे काम काढून घेतल्यानंतर नवीन एजन्सीकडे काम देण्यात आले आहे. आता येथील पूरस्थिती बदलत असून समाधानाची स्थिती आहे. आताच्या घडीला १७८ रुग्ण उपचार घेत असून यापैकी काही रुग्णांना भेटून त्यांच्याशी सोई-सुविधा आणि उपचारांबद्दल चर्चा केली. यावरून रुग्णांमध्ये समाधान असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. याआधी रुग्णांच्या नातेवाईकांना भेटू दिलं जात नव्हतं, त्यावर आपल्या सुचनेनुसार दिवसातून तीन वेळा नातेवाईकांना संपर्क साधता येण्याची सुविधा व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे. नातेवाईकांना सद्यस्थितीची माहिती दिली जाते. उपलब्ध औषधे आणि ॲम्बुलन्स याचीही माहिती घेतली आहे. शिवाय रुग्णांना दिलं जाणाऱ्या जेवणाचीही स्थिती स्वतः समजून घेतली. एकूणच परिस्थिती स्थिरावत असल्याचे चित्र आहे.

येत्या दोन दिवसांत आणखी १०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार असून आयसीयू बेड्सची संख्या ६० पर्यंत नेण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने रुग्णालय सुरु होत आहे. रुग्ण, नातेवाईक, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एक बैठक घेऊन विभागीय आयुक्त सौरव राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचे मोहोळ यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये