कर्वेनगरमधील वनदेवी वन उद्यानातील वृक्ष संपदा आगीत होरपळली : वन विभागाचे दुर्लक्ष

कर्वेनगर :कर्वेनगर मधील वनदेवी टेकडीवर असलेल्या वनदेवी वन उद्यानातील वृक्ष संपदा होरपळून निघाली असल्याचे सध्याचे चित्र आहे. या टेकडीरील वृक्ष संवर्धनाकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कर्वेनगरमधील वनदेवी मंदिरामागे असणाऱ्या टेकडीवर वन विभागाकडून वनदेवी वन उद्यान विकसीत करण्यात आले आहे. येथे वन विभागाने तसेच अनेक सामाजिक संस्था व स्थानिक नागरिकांनी लावलेली देशी झाडे चांगल्या प्रकारे वाढत होती. टेकडीवर लोखंडी कृत्रिम प्राणी, खेळणी बसवण्यात आली होती. या टेकडीवर नियमित चालायला येणारे नागरिक या झाडांचे संगोपन करत आले आहेत. उन्हाळ्यात रोज पाण्याच्या बाटल्या आणून झाडांना पाणी देऊन येथील झाडे नागरिकांनी जगवली पण त्यांच्या या प्रयत्नांना मर्यादा आहेत.



स्थानिक सामजिक कार्यकर्ते संतोष वरक यांनी सांगितले की, सध्या या टेकडीवरील झाडे वाळलेल्या गवताला लागलेल्या आगीत होरपळून गेली आहेत. ही झाडे पुन्हा तग धरणार का असा प्रश्न उभा राहिला आहे. बसवण्यात आलेल्या कृत्रिम प्राण्यांची ही दुरवस्था झालेली आहे. खेळणीही तुटलेली आहेत. तर प्रकाशव्यवस्था ही नादुरुस्त झालेली आहे. एकूणच वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हिरवीगार दिसणारी टेकडी भकास होऊ लागली आहे. आता सध्या टेकडीकडे बघू वाटत नाही अशी अवस्था झाली आहे.
अशीच परिस्थिती राहिली आणि वन विभागाने या प्रकाराकडे लक्ष दिले नाही तर पर्यावरण प्रेमी नागरिकांना घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा संतोष वरक यांनी दिला आहे.

















