रशियाचा युक्रेनवर हल्ला; 100 नागरिकांचा मृत्यू

रशियाने युक्रेनमध्ये घुसखोरी केली असून युद्धाला सुरुवात झाली आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळलं जाऊ शकत नाही असं पुतिन म्हणाले आहेत. या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे पुतिन यांनी सांगितलं आहे. रशिया-युक्रेनच्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगासह भारतातही पहायला मिळणार आहेत. या युद्धामुळे भारतात मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. कोणत्या वस्तूंच्या किमती वाढू शकतात, याबद्दल तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. यामध्ये नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, गहू, धातू महाग होऊ शकतं. युक्रेनमधील भारतीयांना घेऊन येणारं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं आहे.

अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. युक्रेनने युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडे विनंती केली असून देशात मार्शल लॉ लागू केला आहे. युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रशियाने हल्ला केला असताना ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना आश्वासन दिलं आहे. “पुतीन यांनी हल्ला केला असला तरी कोणीही पळून जाणार नाही. लष्कर, राजकारणी प्रत्येकजण काम करत आहे. युक्रेन आपली रक्षा करणार,” असं ते म्हणाले आहेत.
रशियन सैन्याने युक्रेनवर आक्रमण सुरू केलं असताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मॉस्कोच्या सुरक्षा चिंतेचे कितीही कौतुक केले जात असले तरी युद्धाचा अवलंब करणं किंवा समर्थन करणं अशक्य आहे. भारताने रशियाला थांबण्यास सांगितलं पाहिजे असं म्हटलं आहे.
शशी थरुर यांनी रशिया दौऱ्यावर असणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही खडे बोल सुनावले आहेत. यावेळी त्यांनी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण करुन दिली आहे. 1979 मध्ये वाजपेयी परराष्ट्र मंत्री असताना चीनने व्हिएतनामवर हल्ला केल्यानंतर त्यांनी दौरा रद्द केला होता अशी आठवण त्यांनी करुन दिली आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान दोन दिवसांच्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. एकीकडे पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली असताना दुसरीकडे इम्रान खान यांचा दौरा असल्याने जागतिक पातळीवर चर्चा सुरु आहे. रशियाने युक्रेनमधील दोन प्रांतांना राष्ट्र म्हणून मान्यता तसंच युद्धाची घोषणा केल्यानंतर तिथे दौरा करणारे ते पहिलेच नेते ठरले आहेत. नवाज शरीफ यांनी 1999 मध्ये केलेल्या दौऱ्यानंतर ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.



