पुणे शहर

जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने मनस्ताप



पुणे : पुणे महानगरपालिकेचे जन्म व मृत्यू दाखले देणे व नोंद ठेवणे यासाठी आरोग्य विभाग अंतर्गत स्वतंत्र जन्म व मृत्यू नोंदणी कार्यालय आहे. पण सध्या या यंत्रणेकडून  वेळेत जन्म व मृत्यू चे दाखले मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या संदर्भात महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले असून याबाबत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. धुमाळ यांनी म्हंटले आहे की मार्च २०२० पासून जन्म व मृत्यू दाखले नागरिकांना वेळेत मिळत नाहीत असे निदर्शनास येत आहे. यावर माहिती घेतली असता प्रशासकीय कामकाजासाठी सेवक वर्ग नाही अशी माहिती सांगितली जात आहे. परिणामी नागरिकांना जन्म व मृत्यू दाखले मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. मृत्यू होऊन ६ महिने उलटले तरी मनपाकडे याबाबत नोंद नाही.  नागरिक कार्यालयात दाखले मिळावे म्हणून गर्दी करतात परंतु त्यांचे निराकरण न करता अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

वास्तविक जन्म व मृत्यू यांच्या नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र कार्यालय संगणकीय यंत्रणा उपलब्ध करून दिलेला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदार व वेळेत काम पूर्ण न करण्याच्या धोरणामुळे जन्म व मृत्यू कार्यालयात रांगा लागत आहेत . याबाबत जन्म व मृत्यु नोंदणी विभाग प्रमुख व संबंधित काम करणारे अधिकारी व कर्मचारी वेळेत काम करत नसल्याची माहिती घेऊन आवश्यकता वाटल्यास कर्तव्यात कसूर केल्याबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये