कोथरुडमध्ये उद्यापासून साहित्यिकांची मांदियाळी..

साहित्यिक कलावंत संमेलनाला होणार सुरवात..
कोथरुड : डिसेंबर महिना सुरू झाला की साहित्यप्रेमींना वेध लागतात ते कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे कारण या संमेलनात साहित्याचे विविध पैलू रसिकांसमोर उलगडले जात असतात. प्रकट मुलाखत, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ग्रंथ, व चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून साहित्याची अनुभूती साहित्य रसिकांना याठिकाणी अनुभवता येत असते.
यंदाचे दोन दिवसीय २१ वे साहित्यिक कलावंत संमेलन उद्यापासून म्हणजेच २५ डिसेंबरपासून कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सुरू होत असून दोन दिवस कोथरुड मध्ये साहित्यिकांची मांदियाळी असणारा आहे. या संपूर्ण संमेलनाबाबतची माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष, नगरसेवक दिलीप बराटे यांनी दिली आहे.
या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन उद्या शनिवार दि. २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते होणार असून यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ ताराबाई भवाळकर या संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर व महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित असणार आहेत उद्घाटनापूर्वी सकाळी ९.३० वाजता सुप्रसिद्ध चित्रकार प्रा. राहुल बळवंत यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे व साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
त्यानंतर दुपारी २ ते ४ या वेळेत डॉ. प्रतिमा इंगोले व विजयराव जाधव यांचे कथाकथन होणार आहे. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत जागतिक युद्धखोरी आणि भारताची दिशा या विषयावर परिसंवाद होणार आहे, त्यामध्ये श्रीराम पवार, जतीन देसाई, संजय सोनवणी, डॉ. अमोल देवळेकर यांचा सहभाग असणार आहे. ६ ते ८ या वेळेत अस्मिता ठाकूर निर्मित कथकधार हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम होणार आहे.

दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आठवणीतल्या शांताबाई हा कार्यक्रम होणार आहे दुपारी २ ते ४ या वेळेत साहित्य आणि राजकारणातील जातीयता या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये अविनाश धर्माधिकारी, संजय आवटे, दिलीप बराटे, डॉ.गणेश मोहिते सहभागी होणार आहेत. दुपारी ४ ते ६ वेळेत अभिनेत्याशी गप्पा या सदरात सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर सहभागी होणार आहेत.
सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत स्व. रमेश गरवारे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वाग्यज्ञ साहित्य व कला गौरव पुरस्कार साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे व अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म.जोशी यांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सायंकाळी आठ ते दहा या वेळेत मान्यवरांचे कवि संमेलन होणार असून त्यामध्ये नामवंत कवी सहभागी होणार आहेत.



