कर्वेनगरमध्ये रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना फलकांच्या माध्यमातून समज ; स्वप्नील दुधाने यांनी उचलले पाऊल..

कर्वेनगर : कर्वेनगर परिसरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेने पडणारा कचरा स्थानिककांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बेजबाबदार नागरिकांमुळे हा प्रकार घडत असल्याने त्यांना स्वच्छतेची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्नील दुधाने यांनी पुणेरी उपाय शोधला आहे. त्यांनी पुणेरी पाटी स्वरूपातील फलक ठिकठिकाणी लावून अशा बेजबाबदार नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न केला आहे.
कर्वेनगर मधील गोल्डन पेटल, लक्ष्मी नारायण पार्क जवळ भालेकर उद्यान कॉर्नर, कर्वेनगर मुख्य चौकात उड्डाण पुलाखाली, श्रमिक वसाहत, कॅनॉल रस्त्यावर आरोग्य कोठीला लागून, कॅनॉल रस्त्यावर पार्थ बिल्डिंग समोर, गालिंदे पथ रस्त्यावर, नदी कडेच्या डीपी रस्त्याच्या कडेने, अशा ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागत आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी काही बेजबाबदार व्यक्ती व व्यायासायिक कचरा आणून टाकत असल्याने सकाळी या रस्त्याने जाताना कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
घरोघरी जाऊन कचरा उचलण्याची व्यवस्था असतानाही घडणार हा प्रकार थांबवण्यास प्रशासनाला यश येत नसल्याचे दिसत होते. या प्रकार बाबत सिंहासन न्यूज कडूनही आवाज उठवण्यात आला होता. त्यावेळी कचरा पडत असलेल्या ठिकाणी माणसे थांबवून पालिकेने हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यालाही मर्यादा येत असल्याने हा प्रकार चालूच होता.
याबाबतीत माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने व राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष स्वप्नील दुधाने यांच्याकडेही तक्रारी गेल्या होत्या. हा प्रकार थांबवण्यासाठी बेजबाबदार नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणिव करुन देण्यासाठी स्वप्नील दुधाने यांनी कचरा पडत असलेल्या स्पॉटला फलक लावले असून त्यावर
आम्ही परिसर स्वच्छ करू शकतो……
मात्र आपले विचार नाही…..
तेव्हा येथे कचरा न टाकून आपले विचार
आपण स्वतः स्वच्छ करावे.
आपल्या डोक्यातील कचरा
येथे टाकून
आपले शहर घाण करू नये…
अशा स्वरूपाचा आशय लिहिण्यात आला आहे. हा पुणेरी पद्धतीचा आशय बेजबाबदार नागरिकांच्या डोक्यात घुसला तर नक्कीच हा प्रकार थांबू शकतो अशी अपेक्षा सध्या तरी धरायला हरकत नाही.
याबाबत स्वप्नील दुधाने म्हणाले, काही बेजबाबदार नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यावर कचरा टाकून आपला परिसर अस्वच्छ करत होते. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्या होत्या. सूचना करूनही कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होत नव्हते, त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी कचरा पडत असलेल्या ठिकाणी पुणेरी पद्धतीने फलक लावण्यात आले आहेत. यानंतर या भागातील कचरा टाकणे नक्कीच थांबेल, असा विश्वास वाटतो. हा प्रकार थांबवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जाईल.

रस्त्यावर पडणारा कचरा थांबवणे ही एक सामाजिक मोहीम आहे. स्वप्नील दुधाने यांसह अनेक जण यासाठी प्रयत्नशील आहेत. दुधाने यांनी फलक लावून महत्वाचे पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही यात सहभाग नोंदवण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर कचरा टाकताना कोणी निदर्शनास आल्यास त्यांना समज देऊन जबाबदारीची जाणिव करुन देणे गरजेचे आहे. प्रशासनाने ही अशा बेजबाबदार नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलणे आवश्यक आहे. सर्वांनीच लक्ष घालून हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न केला तर नक्कीच फरक जाणवेल.



