ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन

पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर (Madhu Kambikar) यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. मुंंबईतील एका कार्यक्रमात 2016 मध्ये लावणीचं सादरीकरण करताना त्या बेशुद्ध झाल्या. तेव्हापासून त्या अंथरुणावर खिळून होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

कांबीकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून व कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. 1977 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्यनाट्य सादर केलं. तमाशानंतर त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. चित्रपट, लोकनाट्य, व्यावसायिक रंगभूमी ते दूरदर्शन मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या ‘शापित’ या चित्रपटातून मधू कांबीकर यांच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली. ‘हेच माझं माहेर’, ‘राघुमैना’, ‘एक होता विदूषक’, ‘झपाटलेला’, ‘डेबू’ आणि ‘येऊ का घरात’, ‘सतीची पुण्याई’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘रावसाहेब’ मुक्ता, कुंकू, राजा पंढरीचा, गोष्ट छोटी डोंगराएवढी यांसारख्या सिनेमामधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील. दादू इंदूरीकरांच्या गाढवाचं लग्न नाटकात मधु कांबीकर यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली. ‘भानगडीशिवाय पुढारी नाही’, विच्छा माझी पुरी करा या गाजलेल्या नाटकांमधून मधु कांबीकर यांनी रंगभूमी गाजवली.
100 हून अधिक चित्रपटांत अभिनय
‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस इथंही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचं प्रशिक्षण दिलं. लोककलेशी असलेली नाळ कायम जपत मधू कांबीकर यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध केलं.



