उद्योगपती विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

नवी दिल्ली : दिग्गज ऑटो कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्स लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. किर्लोस्कर ६४ वर्षांचे होते. टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडमध्ये किर्लोस्कर समूहाची हिस्सेदारी केवळ ११ टक्के होती पण विक्रम किर्लोस्कर भारतातील टोयोटाचा प्रमुख चेहरा होते. टोयोटा गाडी भारतात लोकप्रिय बनवण्याचे संपूर्ण श्रेय त्यांना जाते. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम किर्लोस्कर यांनी ‘एमआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते. टोयोटा इंडियाने मीडिया निवेदन जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे.





