वारजे- आकाशनगरमध्ये बीडीपी झोनमध्ये डोंगरफोड ; पालिका अधिकाऱ्यांचे लक्षपूर्वक दुर्लक्ष

डोंगर फोड करून सपाटीकरण करण्याचे काम जोरात सुरू
पुणे : वारजे मधील आकाशनगर येथील सुगम विश्व कॉलनी जवळ बिडीपी आरक्षण असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणावर डोंगर फोड करून सपाटीकरण करण्याचे काम जोरात सुरू असून पालिका प्रशासनाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा परिसरात आहे. मागील पंधरा दिवसांपासून येथील डोंगर फोड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
बीडीपी जागेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोंगर फोड चालू असताना पालिका प्रशासन अजुन शांत कसे असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे. येथील डोंगर फोडून प्लॉटिंग करून जागा विकण्याचा घाट काही मंडळींकडून घातला गेला आहे. पूर्वीच या बीडीपी क्षेत्रामध्ये अनेक बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत.त्यात अशा कामामुळे आणखी भर पडणार असल्याचे दिसत आहे.
याबाबत या भागातील बांधकाम निरिक्षक सतीश शिंदे यांना कळवण्यात आल्यानंतर पंधरा दिवसांनी जागेवर येत त्यांनी काम बंद केले होते. पण पुढे कोणतीच कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसत आहे. बीडीपी क्षेत्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोंगर फोडत असताना स्थानिक नगरसेवक ही शांत कसे असा सवाल सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शनिवार, रविवार सुट्टीचा दिवस बघून डोंगर फोडीच्या कामाचा वेग आणखीन वाढला होता. डोंगर फोडून जागा सपाट करण्यात आल्यानंतर पालिका अधिकारी कारवाईसाठी पोहचणार आहेत का ? यावर चर्चा रंगू लागली आहे. पालिका अधिकाऱ्यांवर नक्की कोणाचा दबाव येत आहे याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. अशा कामांवर मुळे बीडीपी आरक्षणाच्या मूळ हेतुला धोका पोहोचत असून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होताना दिसत आहे. पालिका अधिकारी पालिकेसाठी काम करतात का आणखी कोणासाठी असा संतप्त सवाल पर्यावरणवाद्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच बीडीपी क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे. एकूणच वारजे कर्वेनगर परिसरातील बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने केलेल्या दिखाऊ कारवाईबाबत प्रसार माध्यमांमधून टीका करण्यात येत असते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत आहे. आता या चालू असलेल्या डोंगर फोडिवर कधी कारवाई होणार हे पहावे लागणार आहे .
अतिरिक्त भार असल्याने नोटीस देण्यात आली नाही. दोन दिवसात नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल असे बांधकाम निरिक्षक सतीश शिंदे सांगत असले तरी एवढी मोठी डोंगर फोड सुरू असताना कारवाईस विलंब का होत आहे असा प्रश्न निर्माण होतोच.



