वारजेकरांना शब्दब्रम्ह व्याख्यानमालेतून मिळाली वैचारिक शिदोरी

वारजे : पुणे महापालिका, मराठी भाषा संवर्धन समिती, वारजे साहित्यिक कट्टा च्या वतीने शब्दब्रम्ह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या व्याख्यान मालेमधून व्याख्यात्यांनी आपल्या मांडलेल्या विषयातून एक वैचारिक शिदोरी वारजेकरांना दिली. दरवर्षी या व्याख्यानमालेचे संयोजन दिपाली धुमाळ व बाबा धुमाळ यांच्या माध्यमातून केले जाते. या व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी कवयित्री आसावरी काकडे व सिद्धीविनायक महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश त्रिभुवन यांना माय मराठी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विनोद करमणूक करण्याबरोबरच प्रबोधनही करतो. तो माणसाला आंतर्मुख व्हायला भाग पाडतो : डॉ. आशुतोष जावडेकर
या व्याख्यान मालेत विनोदाच्या गावा : मराठी साहित्यातील विनोद परंपरा या विषयावर व्याख्यान देताना लेखक, समीक्षक, गायक, डॉ. आशुतोष जावडेकर यांनी विनोदाला आयुष्यात किती महत्व आहे हे सांगितले.
जावडेकर म्हणले, विनोद हा जगण्यासाठी आवश्यक आहे. तो तुमची करमणूक तर करतोच पण तो प्रबोधनही करतो. तो माणसाला आंतर्मुख व्हायला भाग पाडतो, जगण्याची शक्ती देतो, उभारी देतो. सृष्टीच्या पसाऱ्यात आपलं स्थान किती लहान आहे हे देखील विनोद नकळत आपल्याला दाखवून देतो. असे विनोदाचे आयुष्यातील महत्त्व डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सांगितले.



विनोद सुंदर आणि आभिजात गोष्ट आहे. विनोदाला त्याच्या गुणांमुळेच अभिजात दर्जा आहे, तो आतापासून नाही तर संस्कृत नटकांपासून आहे. त्या सगळ्या नाटकात एक विदूषक असायचा. इंग्रजी शेक्सपीअरच्या नाटकातही तसच असायचं.
जीवन जगताना सहज चार मित्र एकत्र जमतात, गप्पांमध्ये हास्यविनोद होतो आणि सर्वजण हसतात ही महत्वाची गोष्ट आहे. हे जर आयुष्यात नसत तर जगणं शक्यच झाले नसते. हसणं हे देखील माणसाची गरज आहे. विनोदच एक विज्ञान आहे आणि तत्वज्ञान देखील आहे. विनोद एका विशिष्ट कोनातून घटनेकडे, जगण्याकडे प्रसन्नतेने बघतो आणि तो विशिष्ट कोन सगळ्यांकडे नसतो. तुमचे कॉलेजचे ग्रुप आठवा किंवा आताचा एखादा तुमचा ग्रुप असेल त्यात एकच व्यक्ती अशी असते ती सगळ्यांना हसवत असते.
पू. ल देशपांडे यांचं वाक्य आहे. जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या सगळ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला हसवणूक करण्यापलीकडे अजून काय करायचं..
ज्या माणसाने हसवता हसवता या महाराष्ट्रावर मोठे संस्कार केले. त्या माणसाचे हे वाक्य खूप काय शीकवून जाते. मराठी साहित्यातही विनोदच स्थान कसे आहे. त्याची परंपरा कशी आहे हे जावडेकर यांनी आपल्या विनोदी ढंगात विशद केले.



त्रुटी शून्य शासन निर्माण करणारा राजा छत्रपती शिवराय
त्रुटी शून्य शासन निर्माण करणारा राजा कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. असा राजा फार वर्षांनी एखाद्या देशाला मिळतो. अशा महाराजांचे गुण आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो का हा विचार करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे असे पराग ठाकूर म्हणाले.
ठाकूर म्हणाले, शिवाजी महाराज प्रत्येक वेळी एक एका संकटातून सुटत होते. त्या त्यावेळी ती प्रसूती वेदना माता जिजाऊंना सहन करावी लागत होती. त्यामुळे असा शिवाजी महाराज घडवणं ही सोपी गोष्ट नाही. ३५० वर्षानंतर सुद्धा आपण या राजाची आठवण रोज काढत असतो. शिवाजी महाराज म्हंटल की त्यांचे पराक्रमाचे धाडसाचे प्रसंग डोळ्यासमोर येतात. या पराक्रमातून त्यांचे शौर्य अतुलनीय साहस असे विषय आपल्या समोर येतात.
शिवाजी महाराजांचं एक तत्व होत शासन हे चालवायचं असतं त्याकडे पाठ फिरवून चालत नाही. कोणतीही अनुकूलता नसताना त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचं महत्त्व आहे. युद्ध हे केवळ करायचं नाही तर ते जिंकण्यासाठी लढायच हे सांगणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवजीराजा . महाराजांनी अतिशय कमी सैन्य असताना अत्यंत मोठ्या सैनिकांवर विजय मिळवल्याची अनेक उदाहरणं आहेत. गनिमी काव्याला मी शिवकावा म्हणेल कारण गनिमी काव्यासारखं सहाय्य इतर कोणत्याही राजाने घतेलेल नाही असे ठाकूर म्हणाले.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतावर ३६० दुर्ग बांधून त्या द्वारे लढण्याचं काम जे शिवाजी महाराजांनी केलं हे त्या पूर्वीच्या कुठल्याही राजाला सुचलं नाही. या डोंगराळ भागाचा शासन व्यवस्थेसाठी असा उपयोग या पूर्वी कुठल्याही राजाने केला नाही. त्रुटी शून्य शासन अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केली. संपर्कातून समाज घडवला. जे जे संपर्कात त्यांच्या पाठीवर हात ठेवला. ती माणस स्वराज्याच्या कामासाठी खस्त व्हायला सुद्धा तयार झाली. स्वराज्य निर्माण करताना जीव द्यायला तयार असणारी लोकं त्यांनी निर्माण केली. महाराजांनी संपर्कातून अशी माणसं तयार केली. हीच शिवाजी महाराजांची निती होती.



व्हीएतनाम सारख्या छोट्या राष्ट्रान अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी १४ वर्ष युद्ध केलं आणि व्हीएतनाम ने आमेरिकेला पराभूत केलं. हे केल्यानंतर तिथला जो राष्ट्राध्यक्ष होचीन मिन होता त्याला लोकांनी विचारल यामागची प्रेरणा तुमची नेमकी कोणती होती. तर तो सांगतो भारतामध्ये महाराष्ट्र नावाचं ठिकाण आहे. आणि तिथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा जो गनिमी कावा आहे तोच आम्ही वापरला आणि अमेरिकेला पराभूत केलं. आमची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
महाराजांची सामाजिक निती पहिली तर स्वराज्य निर्माण करत असताना स्वराज्याची संकल्पना त्यांनी सर्वांना समजून सांगितली. महाराजांनी हे स्वराज्य माझ आहे हे कधीच म्हंटल नाही हे तर रयतेच स्वराज्य आहे असे ते कायम म्हणत त्यांची ही एक सामाजिक निती आपल्याला दिसते. यावेळी ठाकूर यांनी अनेक उदाहरणातून आर्थिक, सामाजिक, राजकीय निती समजावून सांगितली.



लेखिका सुनीता राजे पवार यांनी आपल्या स्त्री काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देताना स्त्री बंधनात कशी अडकत गेली. बंधनातून बाहेर पडण्याचा कसा मार्ग मोकळा झाला आणि तिने कशी प्रगती साधली यावर भाष्य केलं.
ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी ज्योत्स्ना चांदगुडे, वि. दा. पिंगळे, गोपाळ कुलकर्णी, उदय कुलकर्णी, संगीता कुलकर्णी, महेश कुलकर्णी, शरद जतकर, साधना कुलकर्णी, निवृत्ती येनपुरे, जयंत मोहिते, सुरेश जाधव, अशोक शहा, मानसी नलावडे, महादेव गायकवाड, नंदकिशोर बोधाई, अतुल घटवाई यांनी प्रयत्न केले.