कचरा भरलेल्या टेम्पोसह पुणे महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा..कचरा वाहक वेचक संघटना आक्रमक

पुणे : कचरा वेचक वाहक यांनी जमा केलेला कचरा महापालिकेच्या कचरा संकलन केंद्रावर जमा करून घेण्यास गेल्या काही दिवसांपासून टाळाटाळ केली जात आहे. याबरोबरच अनेक समस्यांना कचरा, वेचक, वाहकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात कचरा वाहक वेचकांच्या समस्या सोडवा अन्यथा कचरा भरलेल्या टेम्पोसह पालिकेला घेराव घालण्यात येईल असा इशारा कचरा वाहक वेचक संघटनेच्या वतीने पुणे महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
आज संघटनेच्या वतीने पुणे शहरातील कचरा वेचक आणि कचरा वाहून नेणारे टेम्पो धारक यांना येणाऱ्या अडचणी आणि समस्यांच्या बाबत पुणे महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपयुक्त संदीप कदम यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसात जर कचरा वाहक वेचकांच्या समस्या सुटल्या नाहीत तर कचरा भरलेल्या टेम्पोसह पालिकेला घेराव घालण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे प्रमुख विजय डाकले, आरपीआयचे बाळासाहेब खांकाळ , लहुजी साम्राज्य संघटनेचे विजयराव बगाडे, कचरा वाहक, वेचक संघटनेचे अध्यक्ष नामदेव पुलवळे आदी उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हजारो गोरगरीब नागरिक कचरा गोळा करणे व ते वाहून नेण्याचे काम गेले अनेक वर्षापासून करत आहेत. या सर्व कचरा वेचकांनी जमा केलेला कचरा अनेक वर्षापासून महापालिकेच्या कचरा संकलन केंद्र डेपोमध्ये ते जमा केला जात होता. परंतु गेल्या काही महिन्यापूर्वी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे या सर्व कचरा वाकवेचकांना सदरचा कचरा पालिकेच्या संकलन केंद्र डेपो मध्ये जमा करून घेण्यास टाळाटाळ सुरू केलेली आहे. पालिका अधिकाऱ्यांकडून ठेकेदारांचे हित जपण्याकरता गोरगरीब
कचरा वाहक व वेचक यांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण करून जाणीवपूर्वक त्रास देण्याचे काम चालू असल्याचे आरोप विजय डाकले यांनी केला आहे.
पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिक पणे काम करणाऱ्या कचरा वाहक, वेचक, टेम्पो चालक या त्रास दिला जात असल्याने या प्रश्नावर पुणेकरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी महापालिकेला घेराव घालो आंदोलन करण्यात येणार असल्याचे डाकले यांनी सांगितले.










