यमन रागाने उजळली ‘पहाट दिवाळीची !

भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनतर्फे आयोजन
पुणे :‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट निमित्त ‘पहाट दिवाळीची ,यमन कल्याणची ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी ६. ३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम पार पडला.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. भारतीय विद्या भवन पुणे केंद्राच्या अध्यक्ष , माजी सनदी अधिकारी लीना मेहेंदळे, माजी नगरसेवक नीलेश निकम, विवेक वेलणकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमांत ‘यमन ‘ या शास्त्रीय रागावर आधारित शास्त्रीय बंदिशी, नाटयपदे, भावगीते,मराठी ,हिंदी गाणी सादर केली गेली.या कार्यक्रमात भारतीय विद्या भवन चा शिक्षकवृंदाने सादरीकरण केले . हा कार्यक्रम विनामूल्य होता. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १०४ वा कार्यक्रम होता. कोविड विषयक सर्व प्रोटोकॉल पाळून प्रवेश दिला गेला .

सुरूवातीला श्रेयस कुलकर्णी यांनी बहारदार बंदीश सादर केली. ‘ सखी येरी आली पिया बिन.. देवा घरचे ज्ञात कोणाला? जीवलगा कधी रे येशील तू ‘ या बंदीशींनी श्रोत्यांचे मन जिंकले.यमन हा गुरु प्रकृतीचा हा राग आहे. सांजेचा भाव हा राग निर्माण करतो. भक्तीरसात डुंबवतो. यमन रागावर आधारित गायन ही संकल्पना हा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती.
‘ संगीत सौभद्र ‘ मधील पद ‘ राधाधर मधु मिलिंद ‘ योगेश कुलकर्णी यांनी सादर केले. ‘ ताल बोले चिपळीला ‘ हे गीत शार्दूली कुलकर्णी यांनी सादर केले.रेवती नायडू यांनी ‘रूणू झुणू रे भ्रमरा’ हे गीत सादर केले. योगेश कुलकर्णी, ऋता कुलकर्णी , वैशाली चौगुले, अपूर्वा देवरे, अपूर्व असोलकर, ऋता नवाथे , प्रिया देठे, अपर्णा दास, अपर्णा लिमये, राजश्री खानखोजे , जॅकलिन गायकवाड, स्वालेहा पठाण,यांनीही बहारदार सादरीकरण केले.



शुक्रतारा मंद वारा, ह्रदयी प्रीत जागते, का रे दुरावा, आज जाने की जिद ना करो,अभी ना जाओ, मोह मोह के धागे, जब दीप जले आना,पान खायो सैंया अशी कर्णमधूर गीतांची बरसात या कार्यक्रमात झाली.कालच निधन झालेले ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग यांना आदरांजली म्हणून ‘लपविलास तू हिरवा चाफा ‘ हे गीत अनीता देशमुख यांनी सादर केले.
केदार तळणीकर, प्रसाद वैद्य, तुषार दीक्षित, अनिता देशमुख, योगेश कुलकर्णी यांनी साथसंगत केली. प्रकाश -ध्वनीयोजना संभाजी शिंदे यांचे होती. माधुरी बापट यांनी सूत्रसंचालन केले.