शिवस्मारकाचा निधीही शून्य ! राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर आक्रमक..

‘हा प्रकार पुण्याच्या विकासासाठी घातक!’ बालवडकरांच्या निधीवरून दीपक मानकर यांची स्पष्ट भूमिका..
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या महापालिकेतील विकास निधीला मुख्य सभेत शून्य करण्यात आल्याने पुण्याच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रकारावर स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे.
माध्यमांशी बोलताना दीपक मानकर म्हणाले, “एखाद्या नगरसेवकाचे बजेट काढून घ्यायचे आणि त्याला वेगळ्या पद्धतीने वागणूक द्यायची, असा प्रकार मी गेल्या ४० वर्षांत पाहिला नाही. पुणे शहराच्या दृष्टिकोनातून महापालिकेत चांगले आणि सकारात्मक वातावरण असणे गरजेचे आहे. नागरिकांसाठी आवश्यक असणाऱ्या विकासकामांसाठी नगरसेवकांना मिळणारा निधी खर्च केला जातो. मात्र, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे बजेटही शून्य करण्यात आले आहे. यापेक्षा खेदाची बाब कोणती?”
“ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मत मागता, त्याच महाराजांच्या स्मारकाचे बजेट शून्य करता, याचा प्रभाव संपूर्ण शिवप्रेमींवर पडल्याशिवाय राहणार नाही,” असा थेट इशाराही मानकर यांनी दिला.

याचवेळी त्यांनी महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांच्यावरही निशाणा साधला. “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी गणेश बिडकर यांना स्थायी समितीचे अध्यक्षपदाची संधी दिली, हे त्यांनी विसरता कामा नये. ते अध्यक्ष होऊ शकत नव्हते, मात्र पुणे पॅटर्नच्या माध्यमातून अजितदादांनी त्यांना संधी दिली. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने महायुती म्हणून केलेले कामही त्यांनी विसरू नये,” असे मानकर म्हणाले.
“पुण्यातील वातावरण वेगळे आणि राज्य पातळीवर वेगळी भूमिका, असा दुहेरी निकष ठेवला तर त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या विकासकामांवर होतो. हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे,” असेही त्यांनी सुनावले.
दरम्यान, बालवडकर यांचा विकास निधी शून्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील नेते आणि नगरसेवक आक्रमक झाले आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी महापालिकेत एकत्र येत निषेध नोंदवला. त्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली.
नगरसेवकाच्या विकास निधीवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ निधीपुरता मर्यादित न राहता राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षाचे केंद्र बनला आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून पुणे महापालिकेतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.



