वारजेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणार 75 माजी सैनिकांचा सन्मान ; 15 ऑगस्ट रोजी सोहळ्याचे आयोजन

वारजे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वारजे परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असून या दिवशी वारजे परिसरातील 75 माजी सैनिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्यावतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्यासह सुप्रसिद्ध गायक डॉक्टर अनघा राजवाडे व संजय मरळ यांचा राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रमही यावेळी आयोजित करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता वारजे हायवे रेणुका नगर येथील के.जे. टॉवर बिल्डिंग मिरा हुंडाई शोरूमच्या मागे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने देशासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या 75 माजी सैनिकांना या दिवशी गौरवण्यात येणार असून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करण्यात येणार असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले, तसेच या अभूतपूर्व सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माझी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केले आहे.







