सिंहगडावर इलेक्ट्रिक बस सुरू होणार; खासगी वाहनांना ‘नो एंट्री’

पुणे : खासगी वाहनांचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने सिंहगडावर घाट रस्त्यावर खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्याऐवजी सिंहगडावर आता इलेक्ट्रिक बस धावणार आहेत. महाराष्ट्र आणि कामगार दिनी ही बससेवा सुरू होणार आहे. इलेक्ट्रिक बसचे चार्जिंग स्टेशन आणि बसच्या वेळांचे नियोजन यासाठी करण्यात आले आहे.
बसच्या नव्या पर्यायामुळे सुट्ट्यांच्या दिवशी सिंहगड घाटात होणारी वाहतूक कोंडी सुटण्याची चिन्हे आहेत. सिंहगडाच्या पायथ्यापासून गडमाथ्यापर्यंत लागणाऱ्या वाहनांच्या रांगा टाळण्यासाठी खासगी वाहने बंद करण्याचा निर्णय वन विभागाने सहा महिन्यांपूर्वी जाहीर केला.
पालकमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात ‘पर्यटक लवकरच बसने गडावर जातील,’ अशी घोषणा केली होती. घाट रस्त्यावर ‘पीएमपी’ने केलेल्या ई-बसच्या चाचण्याही यशस्वी झाल्या. पण गडावर जाणाऱ्या बसचे पार्किंग, इलेक्ट्रिक बस धावणार असल्याचे त्यांचे चार्जिंग स्टेशन कुठे असेल, याचे ठोस उत्तर वन विभागाकडे नव्हते. आता सर्व प्रश्नांवर मार्ग सापडले असून, गडावर बसच्या चार्जिंग स्टेशनचेही काम झाले आहे. गोळेवाडीजवळ बस स्टॉप राहणार असून, त्याच परिसरात खासगी गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली आहे. गडावर जाण्यासाठी पीएमपीने चार बस उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे यापुढे गडावर दुचाकी, चारचाकी गाड्या आणि गावकऱ्यांच्या खासगी वाहतूक करणाऱ्या गाड्याही धावणार नाहीत.
काही दिवसांपूर्वी स्थानिक गावकऱ्यांनी खासगी वाहनांच्या बंदीविरोधात आंदोलन केले होते. पीएमपी सुरू झाल्यास गडावर खासगी गाड्यांनी पर्यटकांची वाहतूक करणाऱ्या गावातील तरुणांचा रोजगार जाणार असल्याची त्यांची तक्रार होती. या तरुणांना वन विभागाने रोजगाराचे नवीन साधन द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती. याबाबत वन अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा विरोध मावळला असल्याचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून सिंहगडवर सुट्टीच्या दिवशी दहा ते पंधरा हजार पर्यटक येत आहेत. हल्ली सकाळी नऊ वाजल्यापासूनच प्रवेश शुल्कासाठी गेटवर रांगा लागतात. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंतच गडावरचे पार्किंग फुल्ल झाल्यामुळे पायथ्याच्या गाड्यांना तासभर ‘वेटिंग’वर थांबावे लागते. गर्दीचे नियंत्रण करताना वन कर्मचाऱ्यांची धांदल उडते. गेल्या महिन्यात घाट रस्त्यात अचानक एका वाहनाने पेट घेतल्यामुळे दोन तास घाटरस्ता बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे पर्यटक गडावरच अडकले होते. बस सुरू झाल्याने वाहतूक कोंडी व अन्य प्रश्न आता सुटणार आहेत.




