वसंत मोरेंना मनसेत डावलण्यात येतंय का?

पुणे : महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच मनसेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुकाणू समितीच्या बैठकीला माजी शहराध्यक्ष, नगरसेवक वसंत मोरे रविवारी अनुपस्थित राहिले. त्यामुळे मोरे यांना पक्षात आणि बैठकीला डावलण्यात आल्याची चर्चा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

मनसेतील संघर्ष
महापालिका निवडणुकीसाठी पक्षाकडून विधानसभानिहाय प्रभागातील इच्छुकांच्या प्राथमिक मुलखती घेण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी शहर कार्यालयात सातत्याने बैठका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पक्षाच्या सुकाणू समितीची बैठक झाली. या बैठकीला वसंत मोरे अनुपस्थित असल्याने त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतल्यानंतर वसंत मोरे नाराज होते. मोरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांच्याकडील शहराध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. तेंव्हापासून वरिष्ठ शहर पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील संघर्ष पुढे येण्यास सुरुवात झाली.
तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही : मोरे
पदाधिकारी डावलत असून राज ठाकरे शहर कार्यालयात येत नाहीत, तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका वसंत मोरे यांनी जाहीर केली होती. तेंव्हापासून हा संघर्ष तीव्र झाला आहे. पक्षाच्या रविवारी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीतही मोरे यांना डावलण्यात आल्याची भावना मोरे समर्थकांमध्ये आहे.
बैठकीचे निमंत्रण कसे दिले गेले
दरम्यान, सुकाणू समिती बैठकीचे निमंत्रण समाजमाध्यमातून देण्यात आले होते. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत कोणताही दूरध्वनी नव्हता. अलीकडे सुकाणू समितीच्या बैठकीची कार्यपद्धती बदलली आहे. बैठकीचा निरोप समाजमाध्यमातून दिला जातो. तसा तो मला मिळाला. मात्र अन्य कार्यक्रमांमुळे मी बैठकीला नव्हतो, असे वसंत मोरे यांनी सांगतिले. तर, निवडणूक तयारीच्या संदर्भात बैठक घेण्यात आली. निवडणूकीचा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या बैठकीला कोण उपस्थित नव्हते, याबाबत मला बोलायचे नाही, असे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले.






