वाहतूक पोलिसांच्या रस्त्यावरील थेट कारवाईला ब्रेक; सीसीटीव्हीच्या माध्यमातून होणार कारवाई

पुणे : मोटारसायकल किंवा स्कूटर घेऊन रस्त्यावरून जाताना वाहतुकीच्या नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलीस दंड आकारतात हे चित्र आपण कायम पाहतो. मात्र आता पुण्यात वाहतूक पोलीसांना थेट दंड आकारता येणार नाही. कारण पुण्यात आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच दंड आकारला जाणार आहे, पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात दंडाच्या रुपात पैशांची लूट होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आलाय. पुढील आदेशापर्यंत वाहतुक पोलीसांना फक्त वाहतुकीचे नियमन करावे लागणार आहे. कोणालाही दंड करण्यात येणार नाही.

वाहतूक नियमांचे पालन केले नाही तर वाहतूक पोलिस चलन कापून दंड आकारतात. बऱ्याचदा वाहतूक करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे असते की त्याने नियमांचे उल्लंघन केले नाही मात्र पोलीस बळजबरी करून दंड आकारतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांबाबत अनेक तक्रारी समोर आल्याचे पाहायला मिळते. कित्येक वेळा रस्त्यावरच वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये वाद होतात, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे.






