आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई : चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या सुरु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
ही मुदत २१ ऑगस्ट रोजी संपणार होती. आयटीआय प्रवेश प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरू आहे. राज्यातील ४१७ शासकीय व ५६९ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ८४ व्यवसाय अभ्यासक्रमांच्या एकूण ६ हजार ८६८ तुकड्यांमधून एकूण १ लाख ४५ हजार ६३२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
यापैकी अमरावती विभागात १७ हजार ९८४, औरंगाबाद विभागात १९ हजार २४४, मुंबई विभागात १९ हजार ९४८, नागपूर विभागात २८ हजार १३६, नाशिक विभागात २९ हजार ५००, पुणे विभागात ३० हजार ८२० जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी १९ ऑगस्टपर्यंत २ लाख ५५ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी २ लाख २१ हजार ५८५ विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केले असून त्यापैकी २ लाख ०७ हजार २८५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे विकल्पही भरले आहेत. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ४८ हजार ५१८ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण केली नसल्याचे निदर्शनास येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचण आल्यास त्यांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या कॉलसेंटरची मदत घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या आयटीआय संस्थेशी संपर्क साधून ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्वत:चे जिवनमान उंचावण्यासाठी उपलब्ध संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.




