आणि चुकलेले आजोबा सुखरुप घरी पोहचले : वारजेतील घटना, उत्तमनगर पोलिसांच्या प्रयत्नांना यश..

वारजे : सोमवारी संध्याकाळी एक ७५ ते ८० वयाचे वयोवृध्द गृहस्थ चुकल्याने उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये आले, मात्र पत्ता व नाव व्यवस्थित सांगता येत नसल्याने त्यांना घरी कसे सोडायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. ते फक्त माळवाडी एवढच सांगत होते. पत्ता शोधत असताना पोलिसांनी माजी नगरसेवक किरण बारटक्के यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने परिसरातील अनेकांशी संपर्क करून पत्ता शोधण्यात आला व आजोबांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचवण्यात आले.
बाळकृष्ण चिंचोलकर असे या जेष्ठ गृहस्थाचे नाव त्यांना ते उत्तमनगर येथे आल्यानंतर त्यांना त्यांचे घर कुठे आहे ते वयोमानामुळे आठवत नव्हते. ते फक्त त्यांच्या मुलीकडे राहायला आले आहेत असे सांगत होते. पोलिस स्टेशनमध्ये ते फक्त माळवाडी मासेवाली मासे विकायला बसते त्याच्या शेजारी एवढाच पत्ता सांगत होते आणि मुलीचे आडनाव सांगण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांच्या वयोमानानुसार स्पष्टता नसल्यामुळे आडनाव स्पष्ट होत नव्हते. टेलरिंग व्यवसाय एवढेच कळत होते. यावेळी उत्तमनगर पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई सचिन गायकवाड व सहा.पो उपनिरीक्षक संजय कांबळे हे या आजोबांना गाडीत बसवुन संध्याकाळी सर्व माळवाडी परिसरांत पत्ता शोधत फिरत असताना पोलिस शिपाई सचिन गायकवाड यांनी नगरसेवक किरण बारटक्के यांच्याशी संपर्क साधला.
यावेळी बारटक्के यांनी त्या आजोबांची माहीती घेवुन परिसरातील काही लोकांशी संपर्क केला पण आजोबांची ओळख पटेना. शेवटी यशोदिप चौक येथील शिलाईचा व्यवसाय करणारे रवी बोबडे यांच्याशी बारटक्के यांनी संपर्क केला तेव्हा त्या आजोबांची ओळख पटली. घराचा पत्ता सापडल्यानंतर आजोबांच्या चेहऱ्यावरचा तणाव कमी झाला आणि ते हसु लागले. पोलिसांनी सर्व खात्री करुन आजोबांना सुखरुप त्यांच्या मुलीच्या घरी सोडले.







