कोथरुड मध्ये दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा..

कोथरुड : रिमिक्स गाण्यावर थिरकणारी तरुणाई, गोविंदा आला रे आलाचा जयघोष करत उल्हासित व चैतन्यमय वातावरणात कोथरुड परिसरातील दहीहंड्या फोडण्यात आल्या.

एकलव्य कॉलेज डीपी रस्त्यावरील शिवशाही प्रतिष्ठानची दहीहंडी चेंबूर येथील सहयोग मंडळाच्या गोविंदा पथकाने ६ थर रचून फोडली. या पथकाने सुरवातीला ७ थराची सलामी देत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अंजली गोरडे व राजा गोरडे यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडी ला मोठ्याप्रमाणात कोथरूड मधील डिपी रोड परिसरातील नागरिक आपल्या कुटुंबासहित उपस्थित होते. जल्लोष पूर्ण वातावरणात ही हंडी फोडण्यात आली.



महिलांची दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेली मनसे व ओम चॅरिटेबल ट्रस्टची महिला दहीहंडी चेंबुरच्या अमर ज्योत सेवा मंडळाच्या गोपिका पथकाने फोडली आणि महिलांनी एकच जल्लोष केला. या दहीहंडीला मोठ्याप्रमाणावर उपस्थित असणाऱ्या कोथरुड मधील महिलांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत मनमुराद नाचण्याचा आनंद घेतला. मनसेचे सरचिटणीस, माजी नगरसेवक किशोर शिंदे यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते.



छ्त्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारका जवळील श्री तुळजाभवानी माता मंदिर व श्री राधाकृष्ण सेवा संस्था कोथरूड गाव आयोजित दहीहंडी ठाण्याच्या शिवसाई पथकाने फोडली. यावेळी माजी नगरसेवक ॲड. योगेश मोकाटे यांनी आयोजन केले होते.



पौड रस्त्यावरील अखिल वनाझ कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्टची दहीहंडी मुंबईतील गोविंदा पथकाने फोडली. यावेळी अभिनेता रमेश परदेशी यांना कोथरुड भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. अभिनेते शरद केळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ॲड राहुल म्हस्के यांनी या दहीहंडीचे आयोजन केले होते. यावेळी मुख्य प्रायोजक रिम कॉलेजचे सीईओ सूरज शर्मा, सोनिया शर्मा , मार्गदर्शिका दिव्या पच्चीगर, उत्सव प्रमुख कुणाल पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.






