बाप्पाचे विसर्जन करायचे कसे पुणेकर संभ्रमात
बाप्पाचे विसर्जन करायचे कसे पुणेकर संभ्रमात
महापालिकेकडून अद्याप नियोजन नसल्याचा विरोधीपक्षनेत्यांचा आरोप
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन संदर्भात महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद द्यायला तयार आहेत, मात्र महापालिकेकडून अद्यापपर्यंत विसर्जनासाठी आवश्यक अमोनिया कार्बोनेट पावडर वितरणाची व्यवस्था झालेली दिसत नसून फिरत्या हौदांचा मार्ग ठरवला पण वेळापत्रकच देण्यात आलेले नाही.त्यामुळे उद्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन संदर्भात नागरिकांमध्ये संभ्रम असून पालिकेकडून ढिसाळ नियोजन करण्यात आल्याचा आरोप पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे.
उद्या दिड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होणार आहे महापालिकेकडून गणपतीचे विसर्जन घरीच करा.असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी अमोनिया कार्बोनेट पावडर उपलब्ध करून दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र ती पावडर कुठे मिळणार याची कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
विसर्जनासाठी हौद फिरवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे, त्याचा मार्ग ठरवण्यात आला आहे पण त्या मार्गावर विसर्जनाचा हौद कोणत्या वेळेला येणार त्यावेळा नागरिकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विसर्जनाची तयारी कशी करावी असा प्रश्न नगरिकांपुढे पडला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. नागरिक याबाबत वारंवार फोन करून माहिती विचारत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक पाहता पहिल्याच दिवशी दिड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनाचे नियोजन होणे आवश्यक होते पण तसे झालेले दिसत नाही. क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित लोकांनाही याबाबत अजूनही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना पुणे महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास म्हणाले,गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्यावतीने फिरत्या विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचे वेळापत्रक उद्या सकाळी महापालिकेकडून जाहीर करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनासाठी पालिकेकडून वाटप करण्यात येणाऱ्या पावडरचे प्रत्येक विभागातील आरोग्य कोटी मध्ये पावडर पोहोचवण्यात आली आहे.




