महाराष्ट्र

‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा, म्हणाले “मराठी…”

मुंबई : मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शक ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाला तोंड फुटलं आहे. चित्रपटातील व्हीएफक्स आणि सैफ अली खानने साकारलेल्या ‘रावणा’च्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराच दिला आहे. यादरम्यान मनसेने मात्र ओम राऊत यांना पाठिंबा दिला असून जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

अमेय खोपकर यांचे ट्विट

मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ सिनेमाला पूर्ण पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच चित्रपटावर होणारी टीका दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

“ओम राऊत या दिग्दर्शकाने यापूर्वी लोकमान्य आणि तान्हाजी या कलाकृतींमधून इतिहासाची अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ओम राऊत यांनी साकारलेला भव्य लाईट अँड साऊंड शो आजही दिमाखात सुरु आहे. त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं दुर्दैवी आहे,” असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

Img 20220910 wa0003

“ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ चित्रपटाला पूर्ण पाठिंबा आहे,” असं अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलं आहे.

“मनसे ओम राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. मी त्यांना चांगला ओळखतो. ते अत्यंत हिंदुत्ववादी आहेत. त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. राम कदम किंवा आपल्याला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे इतर नेते ९५ सेकंदांच्या टीझरवरुन सिनेमा कसा असेल याचा कसा काय अंदाज लावू शकतात. लोकांना याचा निर्णय घेऊ द्या,” असंही अमेय खोपकर म्हणाले आहेत.

Img 20221006 wa0245

“चित्रपट प्रदर्शित होऊ द्या, आणि त्यात खरंच देवी-देवतांचा अपमान झाला असेल, तर तेव्हा विरोध करु शकतो. ते तुम्हाला चित्रपट पाहा असं सांगत आहेत. पण आत्तापासूनच एका हिंदू आणि मराठी दिग्दर्शकाचं तुम्ही खच्चीकरण करत आहात. ही योग्य पद्धत नव्हे. त्याचं खच्चीकरण करु नका,” असं आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.

Img 20220924 182515 453

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये