अजित पवारांची किमया एका फोनने निर्णय बदलला.

मुंबई : विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मध्यस्थी यश आले आहे.
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलाश गोरंट्याल यांना फोन करून समजूत काढल्यावर उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला.
त्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि अंबेकर यांना दिलेला निधी मार्च महिन्याच्या पूर्वीचा होता. आपण उपोषण करु नये, असे अजित पवार यांनी गोरंट्याल यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठीही गोरंट्याल अजित पवारांना घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. जालना शहरासह मतदारसंघातील विकासकामांसाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली.
निधीसाठी काँग्रेसच्या ११ आमदारांनी पाठपुरावा केला. मात्र, मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळे काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत. त्यामुळे काँग्रेसचे ११ आमदार उपोषणाला बसणार असल्याचं कैलास गोरंट्याल यांनी सांगितले होते.



