महाराष्ट्र

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ; संतप्त कार्यकर्त्यांची दगडफेक

मुंबई : शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.

सत्तार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावरदेखील दगडफेक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

सत्तार यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आंदोलन केलं. या नरिमन पॉइण्ट येथील बंगल्याबाहेरच्या या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं महिलाही सहभागी झाल्या होत्या. यावेळेस बोलताना विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांसारखा असंस्कृत मंत्री आपण यापूर्वी पाहिला नाही असं म्हटलं आहे. तसेच विद्या चव्हाण यांनी महिलांचा अवमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांबरोबरच अन्य दोन नेत्यांनीही महिलांचा अवमान करणारं वक्तव्य केलं असून त्यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. “अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि रविंद्र चव्हाण या तिघांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा,” असं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.

Fb img 1647413711531 1

गुलाबराव पाटील सुषमा अंधारेंना नटी वगैरे म्हणतात, रविंद्र चव्हाण बलात्काऱ्यांना सोडण्यासाठी भायखळा तुरुंगात बसून आहे. तर अब्दुल सत्तार सुसंस्कृत खासदाराबद्दल बोलतात, हे निंदनीय आहे, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी निषेध नोंदवला. “हा महाराष्ट्र जिजाऊंचा महाराष्ट्र आहे. अब्दुल सत्तारचा राजीनामा द्यावा. त्याशिवाय मुख्यमंत्र्यांना मंत्रालयामध्ये बसू देणार नाही. यापूर्वीही आम्ही इशारा दिला होता,” असंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर राष्ट्रवादीच्या अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या घराची तोडफोड कोणी केलेली नाही. तो कार्यकर्त्यांचा संताप आहे, असं म्हटलं आहे. तसेच, “अब्दुल सत्तारांना झोडून काढल्याशिवाय राहणार नाही”, “सत्तार यांनी पाया पडून सुप्रिया सुळेंची माफी मागणी,” असं महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Img 20221012 192956 045 1

“राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या गलिच्छ टीकेचा मला आणि माझ्या परिवाराला त्रास होत असून मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही.” अशी पहिली प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

अब्दुल सत्तारांच्या आक्षेपार्ह विधानाबाबत विचारलं असता पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी अब्दुल सत्तारांचं वक्तव्य ऐकलं नाही. पण कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीने महिलेविषयी किंवा पुरुषांविषयी आदरयुक्त पद्धतीने टीका केली पाहिजे, असं माझं मत आहे. जर टीकेची पातळी घसरत असेल तर ती अयोग्य आहे” अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.

राज्यभरातून टीका केला जात असताना सत्तार यांनी आता आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. मी महिलांचा नेहमीच सन्मान करतो. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही, असे सत्तार म्हणाले आहेत.

“मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होते. सुप्रिया सुळे यांचे तसेच कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही,” असे सत्तार म्हणाले.

“मी फक्त खोक्यांबद्दल बोललो. मात्र माझ्या या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात आहे. माझ्या वक्तव्याचा संबंध महिलांशी जोडला जात आहे. मी महिलांबाबत एकही शब्द बोललेलो नाही. यापुढेही बोलणार नाही. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तसेच सर्व आमदार महिलांचा सन्मान करतात. मीही महिलांचा सन्मान करणारा कार्यकर्ता आहे,” असेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये