‘ओबीसी’चे हक्क नाकारणाऱ्यांविरोधात एकत्रित लढा : छगन भुजबळ

नवी दिल्ली : ‘ओबीसी’चे हक्क नाकारणाऱ्यांविरोधात एकत्रित लढा आणि सरकारला जातीनिहाय जनगणना (Census) करण्यास भाग पाडा, आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी येथे केले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ओबीसी महासभेच्या वतीने सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसींच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार जातीनिहाय जनगणनेस जो विरोध करते आहे. तो तातडीने थांबवावा व जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
भुजबळ म्हणाले, की महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान देश कधीच नाकारू शकत नाही. त्यांनी केलेल्या कार्यामुळे आज राष्ट्रपतिपदापासून सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर दिसत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून पिचलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. देशात जनगणना न होण्यासाठी केंद्र सरकार कोरोनाचे कारण देत होते. आता मात्र जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करून टाकावी. ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा वाटा त्या समाजाला दिला पाहिजे. अनेक योजनांचा लाभ देताना सरकारला त्या समाजाची लोकसंख्या माहिती नसल्याने अडचणी येतात.
मंडल आयोग लागू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेले शरद यादव यांच्या निधनानंतर ओबीसी समाजाला मोठा धक्का बसला असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. आता त्यांच्यानंतर ही जबाबदारी प्रत्येक ओबीसीने स्वतःच्या खांद्यावर घ्यावी. जातींमध्ये विभागले गेलो, तर कोणता लाभ मिळणार नाही. मात्र एकत्रित राहून ओबीसी म्हणून लढलो, तर मात्र निश्चितपणे समाजाला न्याय मिळेल, असे त्यांनी नमूद केले.




