कोयता गँगची दहशत : कोयता खरेदीसाठी आता द्यावं लागणार आधार कार्ड

पुणे : कोम्बिंग ऑपरेशन करून देखील कोयता गँगची दहशत कमी होत नाही. त्यामुळे यापुढे शहरात कुठेही कोयता खरेदी करायचा असेल तर आधारकार्ड द्यावं लागणार आहे. पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घटनांमध्ये कोयत्याचा वापर दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार सध्या शहरात कोयता खरेदीसाठी आधार कार्ड द्यावं लागणार आहे. यामुळे आता कोयता कुणी विकत घेतला याची माहिती पोलिसांना मिळणार आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजवली आहे. यावर कडक पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने कोम्बिंग ऑपरेशन सुरु केलं. यात अनेक गुन्हेगारांवर कारवाई देखील करण्यात आली. आता पुढचं पाऊल म्हणून पुणे पोलिसांच्या वतीने शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रत्येक कोयता विक्री खरेदी करणाऱ्याला आता पोलिसाच्या आदेशाचं पालन करावं लागणार आहे.




