
पुणे : पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे.
गरीबांचे लढाऊ नेते अशी ओळख असलेले एकबोटे हे समाजवादी विचारांचे होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले. कष्टकऱ्याचेसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आणि तुरुंगवासही भोगला. आणीबाणीतही हे स्थानबद्ध होते. गोल्फ क्लब आणि खराडी इथे विडी कामगारांसाठीची शेकडो घरे त्यांनी उभारली. राणाप्रताप उद्यानात त्यांच्या पुढाकाराने एसेम जोशी यांचा पूर्णाकृती पुतळा त्यांनी उभारला. महात्मा फुले पेठेतून ते निवडून येत.
नुकतेच त्यांच्यात ज्येष्ठ मुलीचे आणि तरुण मुलाचे कोरोनाने निधन झाले आहे. एकबोटे यांना कोरोना झालाय हे समजताच त्यांनी अनेक रुग्णालयाशी संपर्क साधला पण त्यांना कुठेच जागा उपलब्ध झाली नाही अखेर त्यांनी ससून रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथेही त्यांना योग्य उपचार मिळत नव्हता. कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.



