बाळांतपण..सिजेरियन..पाठीतले इंजेक्शन आणि कंबरदुखी

डॉ.सचिन नागापूरकर (अस्थीरोग तज्ञ पुणे)
अस्थीरोग तज्ञ म्हणून कार्यरत असताना बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रूग्णांपैकी साधारणपणे आठवड्यात दोन/तीन महिला गरोदरपण,बाळांतपण, सिजेरियन आणि त्या नंतर सुरू झालेली कंबर व पाठदुखी अशा तक्रारी घेऊन येतात. पण ही कंबरदुखी, पाठदुखी कशामुळे सुरू होते हे पाहणे आवश्यक आहे.
डॉक्टर पाठीत इंजेक्शन दिले, काही महिला सांगतात एकदा इंजेक्शन दिले पण काय झाले आठवत नाही, परत एकदा इंजेक्शन दिले मग माझे सिजेरियन चे ऑपरेशन झाले. आणि खरं सांगू का त्यानंतरच पाठदुखी कंबरदुखी सुरू झाली असे महिला रुग्ण सांगतात.
रूग्णा सोबत तिची आई आणि सोबत सासू आली असेल तर फार अवघड परिस्थिती डॉक्टर म्हणून होते. सासू बाईंच्या मते गरोदरपणात खूप प्रमाणात आराम झाला, फारशी कामे केली नाहीत.आमच्या काळात आम्ही बाळांतपणाला जाईपर्यंत घरातील काम करत होतो. धुणे भांडी करत होता. पती फारसे लक्ष देत नव्हते, आणि ह्यांच्या काळात…जावू देत आपण तरी काय बोलणार.. आजच्या तरुणी बाळांपणानंतर काळजी घेत नाहीत. बिचारी मुलीची आई नाही हो डॉक्टर आमच्या मुलीनं जास्त आराम नाही केला, पण माहित नाही कंबरे मध्ये इंजेक्शन दिले आणि नंतरच कंबरदुखी पाठदुखी सुरू झाली. डॉक्टर म्हणून हे ऐकणे माझ्या सारख्या बऱ्याच डॉक्टरांना हे काही नवीन नाही, परंतु वैद्यकीय विषयातील तज्ज्ञ म्हणून अस्थीरोग तज्ञ म्हणून बाळांतपण, सिजेरियन, ऑपरेशन, कंबरेतील इंजेक्शन आणि कंबरदुखी ह्या बाबतीत माहिती घेणं आवश्यक आहे.
या कारणांचा विचार केला तर
1)गरोदरपणात वाढणारे वजन, पोट पुढे आल्यामुळे कंबर पाठीतील मनक्यांवर ताण पडतो. नैसर्गिक पद्धतीने असणारा पाठीतील बाक वाढतो…
2) शारीरिक हालचाल मंदावलेली असते. परिणामी स्नायूंची ताकद कमी होते आणि कंबरदुखी सुरू होते.
3) बाळांतपणा नंतर बाळाला दुध पाजणे असेल बाळाला जास्त वेळ मांडीवर घेऊन बसणे असेल.
4) गरोदरपणात शरिरात होणारे हार्मोन्समधील बदल.
5) गरोदरपणात शरिराला जास्त प्रमाणात लागणारे व्हिटॅमिन डी चे प्रमाण. जर व्हिटॅमिन डी ची मात्रा कमी पडली तरी कंबरदुखी पाठदुखी सुरू होते.
6) गरोदरपणात कमी होणारे हिमोग्लोबिनचे प्रमाण
7) बाळांतपण पश्चात कमी पडणारे व्यायाम…

अशी बरीच कारणे आहेत ज्यामुळे प्रसुतिपश्चात बर्याच महिलांमध्ये कंबरदुखी पाठदुखी सुरू होते व वाढते..काही प्रमाणात प्रसुती दरम्यान आणि प्रसुती पश्चात हलके व्यायाम ( वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने) केले तर कंबर.. पाठदुखी कमी बंद होऊ शकते. काही प्रमाणात वेदनाशामक औषधे ( वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्याने कारण बाळाला ह्या औषधांमुळे काही त्रास नको)काही महिला घरगुती उपचार करतात. हरकत नाही परंतु जर कंबरदुखी पाठदुखी जास्त प्रमाणात असेल तर वैद्यकीय तज्ञांचे मत अवश्य घ्यावे…
कंबरेमध्ये इंजेक्शन दिले आणि पाठदुखी सुरू झाली असे काही नसते. आपली शंका, आपली तक्रार आणि त्यावरील उपचार आपण वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावा. प्रसुती काळात सकस आहार, हलका व्यायाम, हलकी घरातील कामे( ऑफिस मध्ये सात / आठ महिने होईपर्यंत काम करणाऱ्या महिला आहेत). प्रसन्न आनंदी मन चांगले विचार, वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार हिमोग्लोबिन तपासणी आणि त्या वरील उपचार, व्हिटॅमिन डी ची औषध, प्रसुती पश्चात गरजेनुसार हिमोग्लोबिन आणि व्हिटॅमिन डी ची औषध, सकस आहार, व्यायाम करत राहिल्यास नक्कीच अशा कारणांमुळे होणारी कंबरदुखी पाठदुखी चे प्रमाण कमी होऊ शकते.



