पुण्यात अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू

पुणे : देवयानी फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिच्या मोठ्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू (Suspicious Death) झाला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचं नाव मधू मार्कंडे असं असून ती विवाहित होती. मधूच्या चेहऱ्यावर काही गंभीर अशा जखमा आढळून आल्या आहेत. य़ा घटनेमुळे भाग्यश्री मोटेसोबतच तिच्या चाहत्यांना देखील धक्का बसला आहे.
वाकड परिसरात मधू केक बनवण्याचा व्यवसाय करायची. ज्यामध्ये तिला तिची मैत्रीण मदत करायची. आपल्या व्यवसायासाठी मधूला एका खोली भाड्याने हवी होती. त्यामुळे रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह वाकड परिसरात फिरत होती. रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. त्यामुळे तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीने तिला ताबडतोब नजीकच्या खासगी रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचार होऊ न शकल्याने मधूला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मधूला तपासल्यानंतर ती मृत असल्याचं घोषित केलं.

मधूचा मृत्यू हा काही नैसर्गिकरित्या झालेला नसून त्यामागे घातापातची शक्यता तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. मधूच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारच्या जखमा आहेत ते पाहता तिचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचं तिच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र, मधूच्या नातेवाईकांनी मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केल्यानंतर आता या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत. बहिणीच्या मृत्यूचा भाग्यश्री मोटेला प्रचंड धक्का बसला आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर बहिणीसोबतचे फोटो शेअर करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
यावेळी एक फोटो शेअर करून भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, ‘माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला! माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि आणखी काय-काय होतीस तू माझ्यासाठी? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू होती. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.. कधीच नाही’



